IPL 2027: आयपीएल 2027 ऑक्शनबाबत मोठी अपडेट समोर! डिसेंबरमध्ये या ठिकाणी रंगणार लिलाव

आयपीएल 2027 (Indian premier league 2027) स्पर्धेच्या पुढील हंगामाच्या तयारीदरम्यान ऑक्शनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया (BCCI secretary Devjit Saikia) यांनी सांगितले की, यंदाच्या IPL ऑक्शनचे आयोजन डिसेंबरमध्ये गोव्यात करण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून आयपीएल ऑक्शन भारताबाहेर होत होते. मात्र, यावेळी बीसीसीआयने भारतातच ऑक्शन घेण्याचा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितले की, गेल्या तीन आयपीएल ऑक्शनचे आयोजन सौदी अरेबिया, दुबई आणि अबू धाबी येथे करण्यात आले होते. मात्र, यावेळी डिसेंबरमध्ये गोव्याला IPL ऑक्शनचे यजमानपद देण्यात येणार आहे.
आयपीएल ऑक्शनसोबतच सैकिया यांनी इंडिया ए महिला आणि ऑस्ट्रेलिया ए महिला संघांमधील सामन्यांबाबतही माहिती दिली. धर्मशाला स्टेडियम मधील खराब हवामान आणि सततच्या पावसामुळे आगामी टी-20 सामने मोहालीला हलवण्यात आले आहेत. धर्मशालातील सध्याचे हवामान क्रिकेटसाठी अनुकूल नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सततच्या पावसामुळे क्रिकेटच्या सामन्यांमध्ये अडथळा येऊ नये, यासाठी सामने मोहालीला हलवण्यात आले आहेत.
भारत आणि जपान (India vs Japan) यांच्यात नुकताच झालेला ऐतिहासिक टी-20 सामनाही दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंधांच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे सैकिया यांनी सांगितले. भारतीय संघाचे अभिनंदन करताना त्यांनी म्हटले की, हा सामना केवळ जपानविरुद्ध मिळवलेल्या विजयापुरता मर्यादित नाही. तर, भारत आणि जपानमधील क्रिकेटमधील मैत्रीच्या नव्या पर्वाची ही सुरुवात आहे.
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह (Jay Shah) यांच्या पुढाकारानंतर भारत आणि जपानच्या क्रिकेट बोर्डांनी हा सामना आयोजित करण्यासाठी काम केले. सैकिया यांच्या म्हणण्यानुसार, एडिनबर्गमध्ये जय शाह यांनी त्यांना जपानच्या क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत बसून जपानमध्ये सामना आयोजित करण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले होते. आता ही योजना प्रत्यक्षात आली आहे.
जपानमध्ये झालेल्या या सामन्यादरम्यान प्रेक्षकांचा उत्साह पाहायला मिळाला. त्यामुळे जपानमध्ये क्रिकेट अधिक लोकप्रिय होण्यास मदत होईल, अशी आशा सैकिया यांनी व्यक्त केली. त्यांच्या मते, हा सामना भारत आणि जपानमधील मैत्री मजबूत करण्यासोबतच क्रिकेटच्या विकासासाठी आणि हा खेळ नव्या देशांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक नवी सुरुवात ठरणार आहे.
Comments are closed.