आयपीएल इतिहासातील पहिला प्लेऑफ सामना कोणत्या दोन संघांमध्ये झाला होता? कोण ठरला विजेता?

आयपीएलच्या इतिहासातील पहिला प्लेऑफ सामना 2011 मध्ये खेळवण्यात आला होता. 2008 मध्ये स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या तीन हंगामात अव्वल चार संघांमध्ये उपांत्य फेरी आणि अंतिम सामना खेळवून विजेता ठरवला जात होता. मात्र 2011 पासून प्लेऑफ पद्धती लागू करण्यात आली. पहिल्या क्वालिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने आले होते. लीग टप्प्यात आरसीबीने 19 गुणांसह अव्वल स्थान पटकावले होते, तर सीएसके 18 गुणांसह दुसऱ्या स्थानावर होती. विशेष म्हणजे दोन्ही संघ अंतिम फेरीतही भिडले आणि चेन्नईने सलग दुसरे विजेतेपद जिंकत इतिहास रचला.

क्वालिफायर-1 (24 मे, वानखेडे स्टेडियम):
आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 175 धावा केल्या. ख्रिस गेल स्वस्तात बाद झाल्यानंतर विराट कोहलीने डाव सावरला. त्याने 44 चेंडूत 70 धावांची दमदार खेळी केली. प्रत्युत्तरात चेन्नईकडून सुरेश रैनाने नाबाद 73 धावांची मॅचविनिंग खेळी साकारली. मायकल हसी आणि बद्रीनाथ बाद झाल्यानंतरही रैना आणि महेंद्रसिंह धोनी यांनी संघाला विजय मिळवून दिला. सीएसकेने 6 विकेट्सने सामना जिंकत थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. रैनाला सामनावीर पुरस्कार मिळाला.

आरसीबीने जिंकला क्वालिफायर-2
पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभव झाल्यानंतर आरसीबीला आणखी एक संधी मिळाली. क्वालिफायर-2 मध्ये संघासमोर मुंबई इंडियन्सचे आव्हान होते. या सामन्यात ख्रिस गेलने 89 धावांची विस्फोटक खेळी केली. मयंक अग्रवालसोबत त्याने 113 धावांची भागीदारी रचली. मुंबईची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली आणि संघाला 20 षटकांत 8 बाद 142 धावाच करता आल्या. आरसीबीने सहज विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.

अंतिम सामना (२८ मे, एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई):
घरच्या मैदानावर खेळताना चेन्नई सुपर किंग्जने जबरदस्त प्रदर्शन केले. नाणेफेक जिंकून धोनीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मायकल हसी (63) आणि मुरली विजय (95) यांनी आक्रमक सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी केली. विजय अवघ्या 5 धावांनी शतकापासून दूर राहिला, पण त्याच्या तुफानी खेळीमुळे सीएसकेने 5 बाद 205 धावांचा डोंगर उभा केला. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची फलंदाजी कोलमडली आणि संघाला 8 बाद 147 धावाच करता आल्या. चेन्नईने 58 धावांनी विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली.

Comments are closed.