ऑस्ट्रेलियात होणार IPL चे सामने? क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून BCCI ला मोठी ऑफर; इतिहास घडण्याची शक्य
ऑस्ट्रेलियातील आयपीएल बातम्या : क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय टी-20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. भविष्यात आयपीएलचे काही सामने भारताबाहेर, थेट ऑस्ट्रेलियात खेळवले जाऊ शकतात. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (CA) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) यासाठी खुले आमंत्रण दिल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रस्ताव प्रत्यक्षात आला तर आयपीएलच्या इतिहासात प्रथमच परदेशी भूमीवर लीगचे सामने खेळवले जातील.
द सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या वृत्तानुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बीसीसीआयसमोर ऑस्ट्रेलियात आयपीएल सामने आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यासंदर्भात दोन्ही क्रिकेट बोर्डांमध्ये प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असल्याचाही दावा या अहवालात करण्यात आला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला या कल्पनेला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.
भारतात होणार बिग बॅश लीगचा ऐतिहासिक सामना
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट सहकार्याचे नवे पर्व सुरू होत आहे. बिग बॅश लीग (BBL) च्या आगामी हंगामातील उद्घाटनाचा सामना भारतात खेळवला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात याची घोषणा करण्यात आली होती. 12 डिसेंबर रोजी चेन्नईतील एम. ए. चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर मेलबर्न रेनेगेड्स आणि गतविजेता पर्थ स्कॉर्चर्स यांच्यात हा सामना रंगणार आहे. भारतात परदेशी फ्रँचायझी टी-20 लीगचा अधिकृत सामना होण्याची ही पहिलीच वेळ असेल. त्यामुळे जागतिक क्रिकेटच्या विस्ताराच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.
अधिकृत प्रतिक्रिया अद्याप नाही
आयपीएल सामने ऑस्ट्रेलियात आयोजित करण्याच्या वृत्तावर अद्याप बीसीसीआय किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, या प्रस्तावामुळे क्रिकेट विश्वात चर्चांना उधाण आले आहे.
आयपीएल नंतर BBL सर्वात मजबूत लीग
दरवर्षी डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या आठ संघांच्या बिग बॅश लीगला IPL नंतर जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि स्पर्धात्मक देशांतर्गत टी-20 स्पर्धांपैकी एक मानले जाते. आता BBL चे सामने भारतात आणि भविष्यात IPL चे सामने ऑस्ट्रेलियात खेळवण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने दोन्ही देशांतील क्रिकेट संबंध अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रीडा सहकार्याचा हा नवा अध्याय मानला जात आहे. दोन्ही देशांमधील क्रिकेट देवाणघेवाण वाढल्यास केवळ क्रीडा क्षेत्रालाच नव्हे, तर द्विपक्षीय राजनैतिक संबंधांनाही बळकटी मिळण्याची शक्यता आहे. IPL आणि BBL सारख्या लोकप्रिय स्पर्धांमुळे दोन्ही देशांतील चाहत्यांनाही जागतिक दर्जाचा क्रिकेट अनुभव मिळणार आहे.
हे ही वाचा –
Comments are closed.