सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली नव्हे, हरमनप्रीत कौर 'अशी' कामगिरी करणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू
लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंड आणि भारत महिला संघांमध्ये ऐतिहासिक कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी (१० जुलै) भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने एक अनोखा टप्पा गाठला आहे. या सामन्यात तिने अर्धशतकी खेळी करत आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आणखी एका उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. यामध्ये ३७ वर्षीय खेळाडूने भारताच्या पहिल्या डावात ५८ धावांची संयमी आणि महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याचबरोबर ती या प्रतिष्ठित मैदानावर तिन्ही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये अर्धशतक झळकावणारी पुरुष किंवा महिला क्रिकेटमधील पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे.
हरमनप्रीतने लॉर्ड्सवर कसोटीआधी वनडे आणि टी २० सामन्यांमध्ये अर्धशतकी खेळी केल्या आहेत. आता तिच्या कसोटीतील अर्धशतकाने एकप्रकारचा संच पूर्ण झाला आहे.
लॉर्ड्सवर कसोटी, वनडे आणि टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अर्धशतकी कामगिरी केवळ कुमार संगकारा, माहेला जयवर्धने आणि युनिस खान यांनी केली. आता त्यांच्या खास यादीत हरमनप्रीतचा समावेश झाला आहे.
त्याचबरोबर हरमनप्रीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९००० धावांचा टप्पा पार करणारी तिसरी भारतीय महिला ठरली. तिच्याआधी अशी कामगिरी भारतीय महिला संघांमध्ये केवळ दिग्गज मिताली राज आणि स्मृती मंधाना यांनीच केली आहे.
या सामन्यात भारताच्या आणखी दोन खेळाडूंनी अर्धशतकी खेळी केल्या. स्मृतीने ८३ तर दीप्ती शर्माने ५७ धावा केल्या. त्यामुळे भारताने पहिल्या डावात १० विकेट्स गमावत २८५ धावसंख्या उभारली.
इंग्लंडचा पहिला डाव सुरू असून भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरूवात केली आहे. क्रांती गौडने ३ विकेट्स घेत इंग्लंडच्या फलंदाजीला सुरूंग लावला आहे. यजमानांनी आतापर्यंत ७५ धावसंख्येवर ४ विकेट्स गमावल्या आहेत.
(सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली नाही, हरमनप्रीत कौर ही लॉर्ड्सवर तिन्ही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये अर्धशतक झळकावणारी पहिली भारतीय क्रिकेटर आहे)
लॉर्ड्सवर क्रिकेटच्या तिन्ही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये अर्धशतक झळकावणारे खेळाडू-
युनूस खान (पाकिस्तान)
कुमार संगकारा (श्रीलंका)
माहेला जयवर्धने (श्रीलंका)
हरमनप्रीत कौर (भारत)*
Comments are closed.