इराण आणि म्यानमार FATF च्या ब्लॅकलिस्टमध्ये, आंतरराष्ट्रीय स्तरावर कडक आर्थिक निर्बंधांचा करावा लागणार सामना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

फायनान्शिअल ॲक्शन टास्क फोर्सने (FATF) इराण आणि म्यानमार या दोन देशांना आपल्या ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची मोठी कारवाई केली आहे. मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांना होणारा वित्तपुरवठा रोखण्यात या देशांना सातत्याने आलेले अपयश आणि आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन न केल्याचा ठपका ठेवत ही कठोर पावले उचलण्यात आली आहेत. एफएटीएफच्या या निर्णयानंतर आता इराण आणि म्यानमारला जागतिक पातळीवर अनेक कडक आर्थिक निर्बंधांना सामोरे जावे लागणार असून, यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्था अधिकच संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दैनिक जागरणने यासंदर्भात वृत्त दिले आहे/

एफएटीएफच्या ब्लॅकलिस्टमध्ये समावेश होणे हा कोणत्याही देशाच्या आर्थिक विश्वासार्हतेला बसलेला सर्वात मोठा धक्का मानला जातो. या कारवाईचा थेट परिणाम असा होईल की, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आशियाई विकास बँक आणि युरोपियन युनियन यांसारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आता या देशांसोबतचे आपले आर्थिक व्यवहार आणि कर्जपुरवठा पूर्णपणे थांबवतील किंवा अत्यंत मर्यादित करतील. याव्यतिरिक्त जागतिक स्तरावरील खाजगी बँका आणि गुंतवणूकदारदेखील या देशांमध्ये गुंतवणूक करण्यास धजावणार नाहीत. परिणामी परकीय चलन, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आयात-निर्यातीमध्ये इराण आणि म्यानमारला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

दरम्यान, एफएटीएफ ही संस्था जागतिक पातळीवर बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांवर आणि दहशतवादी अर्थपुरवठ्यावर बारकाईने लक्ष ठेवून असते. इराणवर यापूर्वीच अमेरिकेसह इतर पाश्चिमात्य देशांचे अनेक निर्बंध लागू आहेत. त्यामुळे ही नवी कारवाई त्यांच्यासाठी आणखी डोकेदुखी ठरणार आहे. दुसरीकडे, म्यानमारमध्ये जेव्हापासून लष्कराने सत्ता हाती घेतली आहे, तेव्हापासून तेथील लोकशाही आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर संताप व्यक्त होत आहे. म्यानमारमधील वाढती अस्थिरता आणि आर्थिक गैरव्यवहार यामुळेच त्यांना या यादीत टाकण्यात आले आहे.

Comments are closed.