इराणमध्ये मोठी खळबळ! सत्तापालटाच्या भीतीने सर्वोच्च नेते मोजतबा खामेनींचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी देशातील नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. अमेरिका आणि इस्रायलसारखे शत्रू देश इराणच्या ताकदीसमोर हरले असून, आता ते इराणमध्ये आपापसात भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहेत, असे मोजतबा यांनी म्हटले आहे. लोकांमध्ये निराशा पसरवणारी कोणतीही कृती ही थेट शत्रूला मदत करण्यासारखीच असल्याचे ते म्हणाले आहे. अमेरिका आणि इस्रायल मिळून इराणमध्ये अंतर्गत बंड घडवून आणू शकतात, अशी भीती सध्या इराणला सतावत आहे. मोजतबा खामेनी यांनी एक निवेदन जारी करून असे म्हटले आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
इराणमध्ये या बंडाची भीती वाटण्याची तीन मुख्य कारणे आहेत. पहिले म्हणजे अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर मोजतबा खामेनी हे सर्वोच्च नेते बनले. मात्र तेव्हापासून ते अद्याप एकदाही जनतेसमोर आलेले नाहीत किंवा त्यांचा कोणताही व्हिडीओ समोर आलेला नाही. त्यांचे फक्त लेखी संदेश येत असल्याने लोकांमध्ये अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहेत. दुसरे कारण म्हणजे, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणच्या जनतेला रस्त्यावर उतरून सरकार पाडण्याचे आवाहन केले आहे. तर तिसरे कारण म्हणजे, मे २०२६ मध्ये इराकच्या सीमेवर अमेरिकन शस्त्रास्त्रांचा मोठा साठा सापडला होता. देशात बंड घडवून आणण्यासाठीच ही शस्त्रे चोरून आणली जात असल्याचा संशय आहे.
इराणचे पहिले सर्वोच्च नेते खुमेनी यांच्या ३७ व्या पुण्यतिथीनिमित्त बोलताना मोजतबा खामेनी यांनी देशातील परिस्थितीवर भाष्य केले. शत्रू देश आपल्यावर लष्करी आणि मानसिक अशा दोन्ही बाजूंनी हल्ला करत आहेत. त्यामुळे अशा वेळी इराणच्या नागरिकांनी एकत्र राहणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. इस्रायल आणि अमेरिका जाणूनबुजून लोकांमध्ये फूट पाडून त्यांना सरकारविरुद्ध भडकवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Comments are closed.