अमेरिकेची जहाजे, तळ आमच्या निशाण्यावर; इराणचा इशारा, 14 मुद्द्यांच्या प्रस्तावावर वेळेत उत्तर देऊ

आमचा संयम आता संपला असून इराणच्या जहाजांवर कोणताही हल्ला झाल्यास अमेरिकेची जहाजे आणि ठिकाणांवर मोठे आणि निर्णायक हल्ले करून प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा इराणने दिला आहे. अमेरिकेसोबत चर्चा करणे म्हणजे आम्ही गुडघे टेकले असा अर्थ होत नाही, अशा कडक शब्दांमध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकेला खडे बोल सुनावले आहेत. त्याचवेळी इराणच्या संसदेच्या परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रवक्ते इब्राहिम रेजाई यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून, इराणच्या जहाजांवर कोणताही हल्ला झाल्यास अमेरिकेला परिणाम भोगावे लागतील. अमेरिकेची जहाजे आणि ठिकाणांवर मोठे आणि निर्णयक हल्ले करून प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला आहे.

इराणमध्ये युद्धामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. त्यावेळी पेझेश्कियान बोलत होते. त्यांनी सांगितले की, आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, मात्र यामुळे आम्ही कमकुवत आहोत असे कोणी समजू नये. चर्चा करण्याचे मुख्य उद्दिष्ट हे आपल्या अधिकारांचे रक्षण करणे हेच आहे. देशहितासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे पेझेश्कियान यांनी स्पष्ट केले.

होर्मुझ इंटरनेट केबल्सवर इराण आकारणार टोल

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱया समुद्राखालील इंटरनेट केबल्सचे मुद्रीकरण करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. पाणबुडी फायबर ऑप्टिक केबल्सद्वारे दररोज दहा ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त रकमेचे आर्थिक व्यवहार होतात. त्यामुळे इराणने या केबल्ससाठी शुल्क आकारायला हवे, याचा विचार इराण करत आहे.

इराणच्या उत्तराची प्रतीक्षा – ट्रम्प

अमेरिका आणि इराणमध्ये शांतता चर्चेला पाकिस्तानात पुन्हा सुरुवात होऊ शकते. अमेरिकेने इराणला 14 मुद्दय़ांचा मसुदा पाठवला आहे. या प्रस्तावावर इराणने उत्तर दिलेले नाही. त्यावर इराणकडून उत्तर अपेक्षित आहे. मात्र आम्ही उत्तर देण्यास घाई करणार नसून त्यावर सविस्तर चर्चा करून योग्य वेळी उत्तर देऊ, असे इराणचे परराष्ट्र प्रवक्ते इस्माईल बघई यांनी अमेरिकेला बजावले होते.

खार्ग बेटाजवळ मोठी तेलगळती

उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांमध्ये इराणच्या मुख्य तेल निर्यात केंद्राजवळ पर्शियन आखातात मोठय़ा प्रमाणात तेल गळती झाल्याचा दावा करण्यात आला होता. अनेक तेलवाहू जहाजे अडकून पडली आहेत आणि देशातील साठवणुकीची जागा कमी पडत आहे. यामुळे अतिरिक्त तेल समुद्रात सोडले जात असल्याची दावा करण्यात आला आहे, मात्र इराणने तो फेटाळला आहे. ही तेल गळती 51 चौरस मैलांपेक्षा जास्त क्षेत्रात पसरली आहे. अंदाजे 3,000 बॅरलपेक्षा जास्त तेल पाण्यात सांडले आहे. हे तेल सौदी अरबच्या दिशेने सरकत असून यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

Comments are closed.