…तोपर्यंत तसूभरही मागे हटणार नाही! इस्रायलने केली अमेरिकेची कोंडी, ट्रम्प काय निर्णय घेणार?
इराण आणि अमेरिकेमध्ये नुकताच शांतता करार झाला. मात्र हा करार होऊन 48 तास उलटत नाही तोच इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद केली. इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने हे पाऊल उचलले आहे. यामुळे जगाचे टेन्शन वाढलेले असताना आता इस्रायलने अमेरिकेच्या दबावापुढे झुकणार नाही आणि लेबनॉनमधून सैन्य मागे घेणार नाही हे स्पष्ट केले आहे.
इस्रायलचे सैन्य पुढे अनेक वर्षे दक्षिण लेबनॉनमधील सुरक्षा क्षेत्रात तैनात राहील आणि अमेरिकेच्या दबावापुढे अजिबात झुकणार नाही, इस्रायलचे अर्थमंत्री बेझलेल स्मोट्रिच यांनी म्हटले. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते. जोपर्यंत हिजबुल्लाह पूर्णपणे माघार घेत नाही, तोपर्यंत इस्रायल आपली भूमिका बदलणार नाही. अमेरिकेला देखील इस्रायलच्या मर्यादा माहित आहेत, त्यामुळे वॉशिंग्टनकडून सैन्य मागे घेण्याची कोणतीही अधिकृत मागणी केली जाईल असेही आपल्याला वाटत नसल्याचे ते म्हणाले.
इस्रायल केवळ तात्पुरत्या चौक्या उभारणार नसून सुरक्षा क्षेत्रात कायमस्वरूपी लष्करी पायाभूत सुविधा आणि तळ विकसित करू शकतो. सध्याची सीमा व्यवस्था इस्रायलच्या सुरक्षेसाठी पुरेशी नाही आणि देशाला संरक्षणात्मकदृष्ट्या सुरक्षित सीमा हव्या आहेत, असे त्यांनी नमूद केले. तसेच जोपर्यंत हिजबुल्लाह शस्त्रे टाकत नाही, तोपर्यंत आम्ही तसूभरही मागे हटणार नाही, असा कडक इशाराही त्यांनी दिला. या मुद्द्यावर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि संरक्षण मंत्री देखील आपल्याशी सहमत असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, इराण-अमेरिका करार लागू करण्यासाठी स्वित्झर्लंडमध्ये एक अत्यंत महत्त्वाची बैठक होत आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हॅन्स या चर्चेत सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंडला पोहोचले आहेत. आगामी काही दिवसांत दोन्ही बाजू युद्धविराम आणि या कराराच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा करतील अशी शक्यता आहे.
स्वित्झर्लंडच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणचे शिष्टमंडळ देखील तेथे पोहोचल्याची पुष्टी केली आहे. बर्गेनस्टॉक रिसॉर्ट येथे होणारी ही बैठक अमेरिका आणि इराणमधील नुकत्याच झालेल्या कराराला पुढे नेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. ही बैठक संपल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढे काय निर्णय घेणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद, इस्रायलच्या युद्धखोरीला इराणचे प्रत्युत्तर
Comments are closed.