Iran US War – ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ला स्थगिती; होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांना संरक्षण देणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
इराणसोबत सुरू असलेली शांतता चर्चा आणि राजकीय वाटाघाटींमध्ये सकारात्मक प्रगती होत असल्याचे संकेत देत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ या मोहिमेला तात्पुरती स्थगिती देण्याची घोषणा केली आहे. ‘ट्रुथ सोशल’वर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी ही माहिती दिली. मात्र ही स्थगिती केवळ सागरी मोहिमेपुरती असून इराणवरील आर्थिक आणि लष्करी नाकेबंदी पूर्वीप्रमाणेच कडक राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
इराणसोबतच्या वाटाघाटी एका अंतिम कराराच्या दिशेने सरकल्या आहेत. हा करार अंतिम होतो की नाही हे पाहण्यासाठी आम्ही ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ ही मोहीम काही काळासाठी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र नाकेबंदी सुरूच राहील. पाकिस्तान आणि इतर मित्र राष्ट्रांच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे डोनाल्ड ट्रम्प आपल्या पोस्टमध्ये म्हणाले. तसेच इराणविरुद्धच्या लष्करी मोहिमेत अमेरिकेला मोठे यश मिळाल्याचा दावाही यावेळी ट्रम्प यांनी केला.

काय आहे ‘प्रोजेक्ट फ्रीडम’?
इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडकलेल्या परदेशी जहाजांना तिथून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ ही मोहीम सुरू करण्यात आली होती. आखातामध्ये युद्धाचे सायरन वाजू लागल्याने या मार्गावर अनेक जहाजं अडकून पडली होती. या जहाजांवरील अन्नपुरवठा आणि जीवनावश्यक वस्तू संपत आल्याने अमेरिकेने मानवीय दृष्टिकोनातून ही जहाजे सुरक्षित स्थळी नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ संपले
दुसरीकडे, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ अधिकृतपणे संपल्याची घोषणा केली आहे. वॉशिंग्टनने आपले लष्करी उद्दिष्ट पूर्ण केले असून आता अमेरिकेला संघर्षाऐवजी राजनैतिक तोडगा हवा आहे, असे रुबिओ यांनी सांगितले. मात्र, इराणच्या समृद्ध युरेनियम साठ्याबाबतची चिंता अजूनही कायम आहे.
Comments are closed.