Iran Us War – बंदर अब्बास एअरपोर्टजवळील हल्ल्यानंतर इराणची सटकली, थेट अमेरिकन हवाई तळाला केलं लक्ष्य
इराण आणि अमेरिकेत पुन्हा एकदा युद्ध भडकले आहे. अमेरिकेने इराणच्या बंदर अब्बास एअरपोर्टजवळील भागाला लक्ष्य केले आहे. यानंतर इराणची चांगलीच सटकली असून इराणने अमेरिकन तळांवर हल्ला चढवला आहे. त्यामुळे आखातात पुन्हा एकदा युद्धाचे सायरन वाजू लागले असून संपूर्ण जगाचे टेन्शन वाढले आहे. ‘इंडिया टुडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
स्थानिक वेळेनुसार पहाटे 4.50 च्या सुमारास अमेरिकेच्या एका हवाई तळाला लक्ष्य केल्याची माहिती इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने दिली. बंदर अब्बास विमानतळाजवळ अमेरिकेने केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे इराणने म्हटले आहे. इराणी प्रसारमाध्यमांनी या हल्ल्यात लक्ष्य केलेल्या अमेरिकन तळाचे नेमके ठिकाण जाहीर केलेले नाही. मात्र अमेरिकेने यापुढे कोणतीही कारवाई केल्यास त्यांना तीव्र प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा आयआरजीसीने दिला आहे.
दरम्यान, अमेरिकन अधिकाऱ्यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इराणच्या ड्रोन मोहिमेविरुद्ध नवीन लष्करी कारवाई केल्याची पुष्टी केल्यानंतर काही तासांतच इराणचे हे वक्तव्य समोर आले आहे. अमेरिकन लष्कराने इराणचे चार लढाऊ ड्रोन पाडले. हे ड्रोन या धोरणात्मक जलमार्गात तैनात असलेल्या अमेरिकन सैन्यासाठी आणि व्यावसायिक जहाजांसाठी धोका ठरू शकतात, असा दावा अमेरिकन अधिकाऱ्यांनी केला होता. याशिवाय अमेरिकेने बंदर अब्बास एअरपोर्ट जवळील एका ड्रोन ग्राऊंड-कंट्रोल स्टेशनवरही हल्ला केला.
इराणवर करण्यात आलेली कारवाई मर्यादित आणि संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्याने म्हटले. एप्रिलच्या सुरुवातीला लागू झालेली युद्धबंदी कायम ठेवण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे अमेरिका वारंवार युद्धबंदीचे उल्लंघन करत असल्याचा आरोप इराणने केला आहे.
याच दरम्यान आयआरजीसीने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेशी संबंधित एका तेल टँकरच्या दिशेने गोळीबार केला. यामुळे टँकरला मागे फिरावे लागले, असे वृत्त इराणच्या माध्यमांनी दिले. तसेच इराणच्या समन्वयाशिवाय या जलमार्गातून प्रवास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इतर चार जहाजांनाही इराणी नौदलाने चेतावणी दिल्यानंतर मागे फिरावे लागले, असेही समोर आले आहे.
Comments are closed.