IPL 2026 – ‘सिक्सर मशीन’ वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीनंतर ‘युनिव्हर्स बॉस’ची मोठी भविष्यवाणी, म्हणाला…

इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या एलिमिनेटर सामन्यात बुधवारी रात्री इतिहास रचला गेला. राजस्थान रॉयल्सचा 15 वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध केवळ 29 चेंडूत 97 धावांची वादळी खेळी केली. या खेळी दरम्यान वैभवने युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल याचा आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा 14 वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला. वैभवच्या या कामगिरीचे गेलनेही तोंडभरून कौतुक केले आहे.

वैभव सूर्यवंशी याने हैदराबादच्या गोलंदाजीची पिसे काढत अवघ्या 29 चेंडूत 97 धावा चोपल्या. या खेळी दरम्याने त्याने 12 उत्तुंग षटकार आणि 5 खणखणीत चौकार ठोकले. त्याचा स्ट्राईक रेट होता 334.48 एवढा जबरदस्त. यशस्वी जयस्वाल सोबत मिळून त्याने अवघ्या 7.5 षटकात राजस्थानला 125 धावांची सलामी दिली. यात यशस्वीचे योगदान होते फक्त 25 धावांचे. अर्थात आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम तो मोडू शकला नाही. मात्र त्याच्या या खेळीवर गेलही फिदा झाला.

गेलने आपल्या इंस्टाग्राम पोस्टवर लिहिले, लाजवाब वैभव! आयपीएलला आता एक नवा ‘सिक्स मशीन’ मिळाला आहे. अवघ्या 3 धावांनी ख्रिस गेलचा 2 आंतरराष्ट्रीय टी-20 मधील सर्वात वेगवान शतकाचा (30 चेंडू) विक्रम मोडण्यापासून वैभव हुकला. यावर गेलने त्याला धीर देत मोठी भविष्यवाणी केली. तू दुर्दैवी राहिलास, पण तू लवकरच तिथे पोहोचशील, असे गेल इस्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाला.

एकाच हंगामात सर्वाधिक षटकार

ख्रिस गेलने 2012 च्या आयपीएल हंगामात ५९ षटकार मारले होते. वैभवने या हंगामात आतापर्यंत तब्बल 65 षटकार खेचून गेलचा हा विराट विक्रम मोडीत काढला आहे. कोणत्याही टी-20 स्पर्धेत एकाच हंगामात मारलेले हे सर्वाधिक षटकार आहेत.

पॉवरप्लेमधील नवा राजा

वैभवने मुल्लानपूर येथे झालेल्या सामन्यात पॉवरप्लेमध्ये 8 षटकार मारून श्रीलंकेचा दिग्गज सनथ जयसूर्याचा (2008 मधील 7 षटकार) रेकॉर्ड मोडला. तसेच एका हंगामात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक 490 धावा करण्याचा डेव्हिड वॉर्नरचा (2016 मधील 467 धावा) विक्रमही आता वैभवच्या नावावर झाला आहे.

नॉकआउटमधील सर्वात वेगवान अर्धशतक

वैभवने अवघ्या 16 चेंडूत ठोकलेले अर्धशतक हे आयपीएल प्लेऑफ/नॉकआउट इतिहासातील सुरेश रैनाच्या (2014 विरुद्ध पंजाब) विक्रमाची बरोबरी करणारे संयुक्त वेगवान अर्धशतक ठरले आहे.

अनकॅप खेळाडूचा महाविक्रम

चालू हंगामात वैभवने 15 डावांमध्ये 45.33 च्या सरासरीने आणि 242.85 च्या स्ट्राईक रेटने 680 धावा कुटल्या आहेत. यात एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, टी-२० क्रिकेटच्या इतिहासात एकाच हंगामात 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 600 हून अधिक धावा करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याने राजस्थान रॉयल्सच्याच यशस्वी जयस्वालचा (2023 मधील 625 धावा) अनकॅप्ड खेळाडू म्हणून सर्वाधिक धावांचा विक्रमही मोडीत काढला.

IPL 2026 – लाईव्ह की हायलाईट… वैभवचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ पाहून क्रीडाप्रेमी थक्क; विरोधी खेळाडूंनीही थोपटली पाठ

Comments are closed.