15 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम! जगात पहिलाच फलंदाज ठरला ज्याने…

अवघ्या 15 व्या वर्षी वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने असा धुमाकूळ घातला आहे की, सध्या संपूर्ण क्रिकेटविश्वात त्याचीच चर्चा रंगली आहे. प्रत्येकजण या युवा फलंदाजाचं तोंडभरून कौतुक करताना दिसत आहे. बुधवारी (27 मे) न्यू चंदीगड येथे सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या आयपीएल 2026 एलिमिनेटर सामन्यातही वैभवने पुन्हा एकदा वादळी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

वैभव सूर्यवंशीने राजस्थान रॉयल्ससाठी अवघ्या 29 चेंडूत 97 धावांची विस्फोटक खेळी साकारली. त्याने तब्बल 334.48 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना 5 चौकार आणि 12 षटकार ठोकले. या खेळीदरम्यान त्याने असा विक्रम आपल्या नावावर केला, जो आयपीएल इतिहासात यापूर्वी कोणालाही जमला नव्हता.

वैभव सूर्यवंशी आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान शतक करण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. त्याने 29 व्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र झेलबाद झाल्याने तो 97 धावांवर माघारी परतला. त्यामुळे ख्रिस गेलचा 30 चेंडूत शतकाचा विक्रम मोडण्याची संधी हुकली.

तरीदेखील वैभवने डगआउटकडे परतण्यापूर्वी इतिहासाच्या पानांमध्ये आपलं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं. एका आयपीएल हंगामात तीन वेळा एका डावात 10 किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.

हैदराबादविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात वैभवने 12 षटकार ठोकले. याआधी 25 एप्रिल 2026 रोजी हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्धच त्याने 12 षटकार मारले होते. तर 19 मे 2026 रोजी जयपूरमध्ये लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध त्याने 10 षटकारांची आतषबाजी केली होती.

या यादीत फिन अ‍ॅलन दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आयपीएल 2026 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दोन वेळा एका डावात 10 किंवा त्याहून अधिक षटकार लगावले आहेत.

विशेष म्हणजे, वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत आयपीएल कारकिर्दीत चार वेळा एका डावात 10+ षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. आयपीएल इतिहासातील महान फलंदाज ख्रिस गेलनेही आपल्या कारकिर्दीत चार वेळा अशी कामगिरी केली होती.

Comments are closed.