IRCTC च्या नवीन टूर पॅकेजची घोषणा

11 दिवसांत चार राज्यांची सफर : काशी ते पुरी अन् गंगासागर दर्शन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

रेल्वे प्रवासाद्वारे पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी ‘आयआरसीटीसी’ने एक उत्तम टूर पॅकेज आणले आहे. या टूर पॅकेजद्वारे उत्तर प्रदेश, ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगाल या चार राज्यांमधील सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध वारसा स्थळे आणि अत्यंत पूजनीय तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी अत्यंत किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे डिव्हाईन ईस्ट टेम्पल टूर पॅकेज 11 दिवसांचे असेल.  या प्रवासाची सुरुवात दिल्लीतील सफदरजंग येथून होईल. सफदरजंगहून, हा प्रवास वाराणसी, कोणार्क, चिल्का, भुवनेश्वर, कोलकाता, गंगासागर आणि वैद्यनाथ धाम येथे जाऊन पुन्हा दिल्लीला समारोप होईल.

‘आयआरसीटीसी’च्या डिव्हाईन ईस्ट टेम्पल टूर पॅकेजची किंमत फर्स्ट, सेकंड आणि थर्ड एसीनुसार वेगवेगळी आहे. ‘आयआरसीटीसी’च्या प्रसिद्धीपत्रकानुसार, प्रतिव्यक्ती भाडे फर्स्ट एसी क्लाससाठी 1,13,530 रुपये, सेकंड एसीसाठी 1,06,145 रुपये आणि थर्ड एसी क्लाससाठी 91,370 रुपये इतके आहे. या पॅकेजमध्ये संबंधित क्लासमधील रेल्वे प्रवास, 3-स्टार हॉटेल्समधील निवास, सर्व जेवण (फक्त शाकाहारी), एसी ट्रेनमधील सर्व प्रवास आणि सहली, प्रवास विमा आणि आयआरसीटीसी टूर मॅनेजरच्या सेवा यांचा समावेश आहे. भारत गौरव डिलक्स टुरिस्ट ट्रेन 25 सप्टेंबर 2026 रोजी दिल्ली सफदरजंग रेल्वे स्टेशनवरून सुटेल आणि 11 दिवस चालेल. ही ट्रेन 5 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या सफदरजंग स्टेशनवर परत येईल.

असे घडणार धार्मिक पर्यटन

डिव्हाईन ईस्ट टेम्पल टूर पॅकेजमध्ये वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिर आणि गंगा आरतीचा समावेश आहे. त्यानंतर पुरीतील पवित्र श्री जगन्नाथ मंदिराचे दर्शन घडेल. याव्यतिरिक्त भुवनेश्वर, धौली शांती स्तूप, उदयगिरी आणि खंडगिरी लेणी, कोणार्क सूर्यमंदिर आणि इतर अनेक ठिकाणांचा समावेश असलेला संपूर्ण ओडिशा सर्किट दौरा असेल. ओडिशानंतर पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियलला भेट देता येईल. तसेच हुगळी नदीवर सायंकाळच्या जलपर्यटनाची सफरही करता येईल. तसेच येथील ऐतिहासिक घाट, प्रसिद्ध हावडा ब्रिज आणि विद्यासागर सेतू दाखवले जातील. त्याव्यतिरिक्त कालीघाट मंदिर आणि दक्षिणेश्वर काली मंदिर, तसेच स्वामी विवेकानंदांचा वारसा जतन करणाऱ्या बेलूर मठाचेही दर्शन घडवण्यात येईल. 5 ऑक्टोबर 2026 रोजी दिल्ली सफदरजंगला परतण्यापूर्वी, या दौऱ्याचे अंतिम आध्यात्मिक ठिकाण भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले वैद्यनाथ धाम (देवघर) असल्यामुळे एक अविस्मरणीय आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करणारी यात्रा पूर्ण होईल.

Comments are closed.