वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण? दुसऱ्या टी-20 साठी भारताच्या प्लेइंग 11 मध्ये मोठे बदल!

आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातील पराभवानंतर, भारतीय संघासमोर ‘करा किंवा मरा’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. बेलफास्टमध्ये 28 जून रोजी होणारा दुसरा आणि अंतिम टी-20 सामना जिंकण्यात भारतीय संघ अपयशी ठरल्यास, त्यांना आयर्लंडविरुद्ध टी-20 मालिका गमावण्याच्या नामुष्कीला सामोरे जावे लागू शकते. परिणामी, कर्णधार श्रेयस अय्यर आणि संघ व्यवस्थापन ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे. यात सर्वात जास्त चर्चा 15 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या संभाव्य पदार्पणाबद्दल होत आहे.

बेलफास्टमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला 34 धावांनी पराभव पत्करावा लागला. संजू सॅमसन, ईशान किशन, तिलक वर्मा आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांसारखे अनुभवी फलंदाज अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले. साहजिकच, दुसऱ्या सामन्यात त्यांच्याकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. मात्र, संघ व्यवस्थापन वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी देणार का, हा मुख्य प्रश्न आहे. या युवा फलंदाजाने गेल्या काही महिन्यांत आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, परंतु पहिल्या टी-20 सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. आता या निर्णायक सामन्यात त्याला मैदानात उतरण्याची संधी मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

वैभव टॉप-ऑर्डर फलंदाज आहे, तर भारताकडे आधीच अभिषेक शर्मा (जगातील नंबर-1 टी-20 फलंदाज) तसेच यष्टिरक्षक संजू सॅमसन आणि ईशान किशन यांसारखे पर्याय उपलब्ध आहेत. सध्याच्या वरच्या फळीतील फलंदाजाला वगळणे हा सोपा निर्णय नसेल. अशा परिस्थितीत, वैभवला संघात स्थान देण्यासाठी संघ व्यवस्थापन फिरकी गोलंदाज-अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला बाहेर बसवण्याचा विचार करू शकते. पहिल्या टी-20 सामन्यात सुंदरने केवळ एक षटक टाकले आणि त्यात 19 धावा दिल्या. फलंदाजी करताना तो सहाव्या क्रमांकावर आला, पण 12 चेंडूंत केवळ 9 धावा करू शकला.

जर वैभवला संधी मिळाली, तर तो अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात करू शकतो. त्यानंतर, संजू सॅमसन तिसऱ्या, ईशान किशन चौथ्या, श्रेयस अय्यर पाचव्या, तिलक वर्मा सहाव्या, शिवम दुबे सातव्या आणि अक्षर पटेल आठव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतात.

गोलंदाजीच्या फळीतही बदल होण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा पहिल्या सामन्यात खूप महागडा ठरला होता; त्याने चार षटकांत 57धावा दिल्या आणि एकही विकेट मिळवू शकला नाही. परिणामी, युवा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवला त्याच्या जागी खेळण्याची संधी मिळू शकते. प्रिन्सने या महिन्याच्या सुरुवातीला अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून भारतासाठी पदार्पण केले होते. आता त्याला टी-20 आंतरराष्ट्रीय संघातही संधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईचा अष्टपैलू खेळाडू सूर्यांश शेडगे आणि फिरकीपटू रवी बिश्नोई हे देखील संघात आहेत, मात्र सध्या तरी दुसऱ्या टी-20 सामन्यात त्यांच्या खेळण्याची शक्यता कमीच वाटते.

आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यासाठी भारताचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन (Playing XI): अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रिन्स यादव.

Comments are closed.