तृणमूल काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आहे का?

भाजप सरकार विरोधात ममता बॅनर्जी रस्त्यावर

वृत्तसंस्था / कोलकाता

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये दारुण पराभव पत्कराव्या लागलेल्या तृणमूल काँग्रेस पक्षाला आता फुटीच्या चिंतेने ग्रासले आहे. पक्षनेत्या आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात अनेक आमदार बंड करण्यासाठी सज्ज होत असल्याचे वृत्त आहे. बॅनर्जी यांनी आयोजित केलेल्या तीन बैठकांना पक्षाचे आमदार बहुसंख्येने अनुपस्थित राहिले. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरोधात सोमवारी निदर्शने केली.

तृणमूल काँग्रेसमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे मानले जाणारे नेते आणि ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांना तीन दिवसांपूर्वी संतप्त जमावाने धक्काबुक्की केली होती. या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेसने निदर्शने केली. राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार लोकशाहीची हत्या करीत आहे. विरोधकांना गुंडांकडून मारहाण करण्यात येत आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यांनी रस्त्यावर बसून धरणेही दिले. त्यांच्यासह अनेक कार्यकर्तेही होते. तृणमूल काँग्रेसचे सहा आमदारही ममता बॅनर्जी यांच्यासह निदर्शनांमध्ये सहभागी होते.

भाजपकडून आरोपाचा इन्कार

तृणमूल काँग्रेस सत्तेवर असताना त्या पक्षाने जनतेवर जो अत्याचार केला त्याचे पडसाद आता उमटत आहेत. अभिषेक बॅनर्जी यांना मारहाण करणारे तृणमूल काँग्रेसशीच संबंधित आहेत. सर्वसामान्य जनतेने त्यांच्या विरोधात केवळ निदर्शने केली. त्यांना मारहाण करण्यात सर्वसामान्य लोक किंवा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यांच्यापैकी कोणाचाही हात नाही. जनतेच्या रोषाला मारहाणीचे स्वरुप देऊन तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी राज्य सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा प्रत्यारोप भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी केला आहे.

कलंकितांना नाही पक्षप्रवेश

तृणमूल काँग्रेसमध्ये बऱ्याच घडामोडी घडत असताना भारतीय जनता पक्षाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तृणमूल काँग्रेसमधील कलंकित नेत्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय झाल्याची माहिती पश्चिम बंगाल मधील भारतीय जनता पक्षाचे नेते शमिक भट्टाचार्य यांनी दिली. आम्ही आमच्या पक्षाचे ‘तृणमूलीकरण’ होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोणाची तृणमूल काँग्रेस खरी ?

एकत्र शिवसेना आणि एकत्र राष्ट्रवादी काँगेस यांच्यात 2022 मध्ये ज्या घडामोडी घडल्या, त्या तृणमूल काँग्रेसमध्ये घडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पक्षाच्या काही नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले असून बहुसंख्य आमदारांच्या पाठिंबा असल्याचे प्रतिपादन केले आहे. त्यामुळे हे आमदार एका नेत्याच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेसवर अधिकार सांगतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. तृणमूल काँग्रेसचे निम्म्याहून अधिक आमदार सध्या ममता बॅनर्जी यांच्यापासून अंतर राखून आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये कदाचित या पक्षात भूकंप होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. वरकरणी सारे शांत असल्याचे दिसून येत असले, तरी पक्ष आतून धुमसत आहे, असे बोलले जाते.

 

Comments are closed.