सेमी-क्रायोजेनिक इंजिनची चाचणी यशस्वी इस्रोने दाखवली स्वदेशी तंत्रज्ञानाची ताकद : 88 टक्के कार्यक्षमतेने चालवले इंजिन
► वृत्तसंस्था
नवी दिल्ली
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) नवा इतिहास रचला आहे. तामिळनाडूच्या महेंद्रगिरी येथील इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्समध्ये सेमी-क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी हॉट टेस्ट पूर्ण झाली. ही चाचणी 175 टनच्या अत्यंत उच्च थ्रस्ट पातळीवर घेण्यात आली. या मालिकेतील ही आठवी यशस्वी चाचणी होती. प्री-बर्नर इग्निशननंतर इंजिनच्या कामगिरीची चाचणी घेणे हा याचा मुख्य उद्देश होता. या चाचणीवेळी इस्रोने 88 टक्के कार्यक्षमतेने इंजिन चालवून आपल्या स्वदेशी तंत्रज्ञानाची ताकद दाखवून दिली. या मेगा चाचणीच्या यशाने, भारत आता आपले सर्वात जड रॉकेट ‘एलव्हीएम’ आणखी शक्तिशाली बनवण्याच्या जवळ पोहोचला आहे. या चाचणीमुळे शास्त्रज्ञांना 200 टन थ्रस्टची पूर्ण पातळी गाठण्याचा पूर्ण आत्मविश्वास मिळाला आहे.
इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी शनिवारी या यशस्वी चाचणीविषयी माहिती दिली. सेमी-क्रायोजेनिक इंजिनच्या पॉवर हेड टेस्ट आर्टिकलची यशस्वी हॉट टेस्ट ही देशाच्या अंतराळ कार्यक्रमासाठी एक मोठी उपलब्धी आणि महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले. इस्रो आता संपूर्ण इंजिनची चाचणी घेण्याची तयारी करत आहे. नुकत्याच झालेल्या चाचणीत थ्रस्ट चेंबर वगळून इंजिनच्या थ्रस्ट लोडपैकी सुमारे 90 टक्के लोडची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ही सेमी-क्रायोजेनिक प्रणाली द्रव ऑक्सिजन आणि शुद्ध केरोसीनपासून बनलेले अत्यंत स्वच्छ आणि बिनविषारी इंधन वापरते. हे इंधन पारंपरिक प्रोपल्शन स्टेजच्या तुलनेत लक्षणीयरीत्या उच्च कार्यक्षमता देते. क्रायोजेनिक अप्पर स्टेजच्या संयोगाने, हे तंत्रज्ञान इस्रोच्या मोहिमेला नवीन उंचीवर नेईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.
चाचणीची वैशिष्ट्यपूर्णता…
► इस्रोचे हे नवीन सेमी-क्रायोजेनिक इंजिन पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे. पॉवर हेड टेस्ट आर्टिकलमध्ये थ्रस्ट चेंबर वगळता इंजिनच्या सर्व प्रणालींचा समावेश आहे. हे तंत्रज्ञान भारताला अवकाशात जड उपग्रह प्रक्षेपित करण्यामध्ये आत्मनिर्भर बनवेल.
► चाचणीदरम्यान मुख्य टर्बोपंपाने यशस्वीरित्या 400 आणि 500 बारचा आउटलेट दाब निर्माण केला. यापूर्वीच्या चाचण्या केवळ 47 टक्के आणि 60 टक्के क्षमतेवर घेण्यात आल्या होत्या. 175 टन थ्रस्ट पातळीवर याची चाचणी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
► हे इंजिन सेमी-क्रायोजेनिक प्रोपल्शन स्टेजमध्ये वापरले जाईल. ही नवीन प्रणाली एलव्हीएम-3 प्रक्षेपण वाहनाच्या सध्याच्या एल-110 कोअर स्टेजची जागा घेईल. या अपग्रेडमुळे रॉकेटच्या पेलोड क्षमतेत लक्षणीय वाढ होईल. रॉकेटची परिचालन कार्यक्षमता देखील सुधारेल.
Comments are closed.