उद्योगधंद्याचं इथे राहणं कठीण करून ठेवलेलं आहे, चाकणमधील रस्त्याच्या दुरवस्थेवरून आदित्य ठाकरे यांची सरकारवर टीका

सरकारने उद्योगधंद्यांचे इथे राहणे कठीण करून ठेवले आहे,” अशा आक्रमक शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. चाकण एमआयडीसीमधील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि प्रचंड वाहतूक कोंडीमुळे अनेक उद्योजक वैतागले असून, कंपन्या राज्याबाहेर किंवा इतर जिल्ह्यांत स्थलांतरित करण्याच्या तयारीत आहेत. याच गंभीर परिस्थितीची आज आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि मूलभूत सुविधांच्या अभावावरून सरकारला धारेवर धरले.

यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “एक आपण पाहिलं असेल, मागच्या आठवड्यामध्ये खासदार राजाभाऊ वाजे साहेबांनी जो प्रश्न विचारला होता, उत्तर जे आलं की साधारणपणे महाराष्ट्रातून गेल्या पाच वर्षात ३५,३०० इंडस्ट्रीज या महाराष्ट्रातून बंद झाल्या आणि दुसऱ्या राज्यांमध्ये गेल्या किंवा इथे बंद झालेल्या आहेत. त्याचा रोजगारावर किती परिणाम झालाय, दुष्परिणाम झालाय हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मागच्याच काही दहा-पंधरा दिवसांमध्ये आपण पाहतोय, इकडची (चाकण) पण जी एमआयडीसीचे जे काही उद्योजक आहेत ते देखील आवाज उठवत आहेत की, ज्या त्यांना बेसिक गोष्टी पाहिजे होत्या, ज्या गोष्टी त्यांना प्रॉमिस केल्या गेल्या होत्या… जे गुंतवणूकदार येतात, जे उद्योजक येतात इथे आपल्या मुंबईमध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये, पुण्यात असेल, नाशिक, संभाजीनगर, नागपूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये मग चाकण आहे, तळेगाव आहे. एक बेसिक गोष्ट घेऊन येतात की आम्हाला जेव्हा आम्ही गुंतवणूक करू या राज्यामध्ये तेव्हा आम्हाला कोणी सतावणार नाही, आम्हाला वीज पुरेशी मिळेल, पाणी पुरेसं मिळेल आणि रस्ते चांगले असतील. बाकी तसं काही जास्ती ते मागत नाहीत. पण हे सगळं होत असताना आपण पाहतोय, इकडच्या स्थानिक लोकांनी आणि स्थानिक उद्योजकांनी जो एक विषय समोर आणलेला आहे तो हाच आहे की, २० उद्योग इथून हलायच्या मानसिकतेत आहेत. एवढ्यासाठीच आपण देखील माझ्यासोबत आता दौरा केला.”

आदित्य ठाकरे म्हणाले की, “भयानक परिस्थिती आहे रस्त्याची. ज्या एमआयडीसीमध्ये साधारणपणे आपल्याला इंडस्ट्रीचा वास आला पाहिजे, तिथे कचऱ्याचा वास येतोय, कचऱ्याच साम्राज्य आहे. हा दौरा नियोजित झाल्यानंतर आपण पाहतोय कचऱ्याची सगळीकडे आपण पाहतोय काढायचा प्रयत्न चालू आहे, जेसीबी लावलेले आहेत. दौरा नियोजित झाला, दौरा ठरल्यानंतर रस्त्याची डागडुजी सुरू झालेली आहे. काही काही ठिकाणी तर आपण पाहिलं अक्षरशः चपलेनी ते खड्डे बुजवण्याचा प्रयत्न झालेला आहे. विजेचा प्रश्न आहेच.”

ते म्हणाले, “जसा इकडचा प्रश्न तसा परवाकडे मी नाशिकमध्ये देखील होतो. नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे. अंबड एमआयडीसी असेल तिथून नाशिकपर्यंत पोहोचणं कठीण झालेलं आहे. इथून पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, मुंबई असेल, नाशिक असेल चाकणमधूनच जाणं बाहेर कठीण झालेलं आहे. आणि एकंदरच काय तर एमआयडीसी असेल किंवा पीएमआरडीए असेल, पीडब्ल्यूडी असेल किंवा स्टेट हायवे असेल किंवा नॅशनल हायवे असेल, ताळमेळ नाही कोणाचा. पण सगळीकडे अक्षरशः वाट लावून ठेवलेली आहे आणि उद्योगधंद्याचे इथे राहणं हे कठीण करून ठेवलेलं आहे.”

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “आज हा उद्योजकांनी आवाज उठवलेला आहे, कामगारांनी आवाज उठवलेला आहे. कदाचित उद्या उद्योगमंत्री येतात असं मला कळलं. मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगत आहे की, उद्या येऊ नका, उद्या रविवार आहे. एखाद्या वर्किंग डेला या. प्रोटोकॉल बाजूला ठेवा, सिक्युरिटी बाजूला ठेवा किंवा सायरन न वाजवता आपण फिरा. कारण आपली ही जबाबदारी आहे, किती वेळ कुठे कोण कोण ट्रॅफिकमध्ये अडकतं हे एखाद्या सामान्य नागरिकासारखं किंवा उद्योजकासारखं किंवा कामगारासारखं एकदा या ट्रॅफिकमध्ये अडकून पहा, मग तुमचे डोळे उघडतील आणि मग काहीतरी बदलायला सुरू होईल.”

Comments are closed.