धो-धो पावसात जय जवानची 10 थरांची हॅटट्रिक, अविनाश जाधव म्हणाले, सातबारा आपल्याच बापाचा आहे
जय जवान गोविंदा पाठक 10 थर: मुंबईतील सर्वात जुन्या आणि मानाच्या जय जवान गोविंदा पथकाने शनिवारी दहीहंडी उत्सवात नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. जय जवान गोविंदा पथकाने (Jai Jawan Govinda Pathak) आपल्या लौकिकाला जागत तीनवेळा 10 थर रचण्याची किमया करुन दाखवली. घाटकोपर आणि ठाण्यात दोन ठिकाणी जय जवान गोविंदा पथकाने 10 थर रचून दाखवले. प्रो-गोविंदा स्पर्धेतील (Pro Govinda) वादामुळे प्रताप सरनाईक यांनी जय जवान गोविंदा पथकाला डिवचले होते. मात्र, जय जवान गोविंदा पथकाने त्यांच्याच दहीहंडी उत्सवात 10 थर रचून दाखवले. यानंतर जय जवान गोविंदा पथकाने रात्री धो-धो पाऊस सुरु असताना मनसे नेते अविनाश जाधव यांच्या दहीहंडीतही 10 थर रचले. यानंतर अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी स्टेजवरुन खाली उतरत जय जवान गोविंदा पथकासोबत गुलाल उधळत आनंद साजरा केला.
प्रताप सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक या पितापुत्रांनी प्रो-गोविंदावरुन जय जवान गोविंदा पथकाशी झालेल्या वादानंतर शनिवारी संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाच्या व्यासपीठावरुन कोकण नगर गोविंदा पथक आणि आर्यन्स गोविंदा पथकाचा उदोउदो केला होता. याच पार्श्वभूमीवर अविनाश जाधव यांच्या दहीहंडी उत्सवात 10 थर रचल्यानंतर जय जवान पथकाच्या गोविंदांनी एकच जल्लोष सुरु केला. ‘आज आपण कितीवेळा 10 तर लावले, तीन वेळा लावले. आज हॅटट्रिक केली, ही हॅटट्रिक बापाची आहे. बाप हा बाप असतो’, अशा घोषणा जय जवानच्या गोविंदांनी दिल्या. त्यावर अविनाश जाधव यांनी माईक हातात घेत , सातबारा पण आपल्याच बापाचा आहे’, असे म्हटले.
अविनाश जाधव हे पूर्णवेळ पावसात भिजत गोविंदा पथकांना प्रोत्साहन देत होते. जय जवान गोविंदा पथक 10 थर रचत असताना अविनाश जाधव त्यांचे मनोबल सातत्याने वाढवत होते. जय जवानने 10 थर लावल्यानंतर अविनाश जाधव हे स्टेजच्या खाली उतरून त्यांच्या जल्लोषात सामील झाले. यावेळी अविनाश जाधव यांनी 10 कडक थरचा लहानसा फलकही झळकवला.
Pratap Sarnaik: प्रताप सरनाईक यांनी जय जवान गोविंदा पथकाला काय टोमणा मारला?
कोणी काहीही म्हणू द्या, कोणाचीही युती होऊ द्या. काही गोविंदा पथकांना वाटत असतं की, आमचा विश्वविक्रम मोडणार नाही. आम्ही सार्वभौम आहोत. पण कोकण नगर गोविंदा पथकाने दाखवलं की, विश्वविक्रम ही कोणा एकाची मक्तेदारी नसते. विश्वविक्रम हे मोडण्यासाठीच असतात, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याचा रोख जय जवान गोविंदा पथकाच्या दिशेने होता. जय जवान पथकानेही नऊ थरांचा विक्रम आपल्याच संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत रचला होता, असेही प्रताप सरनाईक यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले होते.
https://www.youtube.com/watch?v=faj70c56agm
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.