ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त झालेला दहशतवादी तळ पुन्हा सुरू, पाकिस्तानकडून 8 कोटी रुपयांची मदत
ऑपरेशन सिंदूरमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर पाकिस्तानातील बहावलपूर येथील संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेल्या जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख अड्डा ‘मरकज सुभानल्लाह’ पुन्हा उभारण्यात आल्याचे समोर आले आहे. सुमारे वर्षभरानंतर या संकुलाची पुनर्बांधणी पूर्ण झाली असून ते पुन्हा कार्यान्वित झाल्याचे वृत्त आहे. ताज्या छायाचित्रांमध्ये आणि दृश्यांमध्ये संकुलातील घुमटांची पुनर्बांधणी करण्यात आल्याचे, मुख्य इमारतीला नव्याने प्लास्टर आणि रंगकाम केल्याचे तसेच संगमरवरी फरशी बसवण्यात आल्याचे दिसून येत आहे.
ऑपरेशन सिंदूरदरम्यान झालेल्या हल्ल्यात मुख्य सभागृहाचे मोठे नुकसान झाले होते. इमारतीमध्ये निर्माण झालेल्या खोल खड्ड्यांमध्ये काँक्रीट भरून डागडुजी करण्यात आली आहे. या हल्ल्यात नुकसान झालेल्या संकुलातील इतर इमारती, त्यामध्ये ‘अल-सबीर’ मदरसा आणि जैशच्या वरिष्ठ नेत्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या निवासी इमारतींचाही समावेश होता. या इमारती पाडून त्यांच्या जागी नव्याने बांधकाम करण्यात आल्याचे समोर आले आहे.
भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या अहवालांचा हवाला देत पाकिस्तान सरकारने जैश-ए-मोहम्मदला 250 दशलक्ष पाकिस्तानी रुपयांची रोकड दिल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यापैकी सुमारे 110 दशलक्ष पाकिस्तानी रुपये केवळ मुख्य संकुलाच्या पुनर्बांधणीसाठी वापरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पुनर्बांधणीचे काम सुमारे 15 महिन्यांच्या कालावधीत करण्यात आल्याचेही वृत्त आहे. मात्र, या आर्थिक व्यवहारांबाबत स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही.
बहावलपूरमधील हे संकुल जैश-ए-मोहम्मदच्या भरती, प्रशिक्षण आणि कारवायांसाठी महत्त्वाचे केंद्र मानले जाते. जैशचा प्रमुख मसूद अझहर आजारपणामुळे सक्रिय नसल्याने या ठिकाणचा दैनंदिन कारभार त्याचे भाऊ तल्हा अल-सैफ आणि मोहिनुद्दीन औरंगजेब पाहत असल्याचे वृत्त आहे.
भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 7 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांवर लक्ष्यित हल्ले केले होते. त्यामध्ये बहावलपूरमधील मरकज सुभानल्लाहचाही समावेश होता. या हल्ल्यात संकुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
दरम्यान, हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मदने आपल्या तळांची पुनर्बांधणी करण्यासाठी निधी उभारण्याचे प्रयत्न सुरू केल्याचेही यापूर्वी समोर आले होते. आता बहावलपूरमधील प्रमुख अड्ड्याची पुनर्बांधणी पूर्ण झाल्याने पाकिस्तानच्या भूमीवरील दहशतवादी पायाभूत सुविधांवर नियंत्रण ठेवण्याबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Comments are closed.