मग काय आता पंतप्रधानांना इथं बोलावायचं काय! ‘जलजीवन’च्या कामावरून विखे उद्विग्न
मोदी सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्यामुळे सर्वत्र गाजावाजा सुरू आहे. मात्र, आज ‘जलजीवन’ योजनेच्या अपूर्ण कामांवरून जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उद्विग्न झाल्याचे दिसून आले. ‘कामे अपूर्ण आहेत, मग काय आता पंतप्रधानांना इथं बोलवायचं काय,’ असे सांगत, ‘कामे पूर्ण झाली नाहीत, ही वस्तुस्थिती आहे,’ अशी कबुलीही त्यांनी जाहीरपणे दिली.
मोदी सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आज येथील कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. यावेळी भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, विनायक देशमुख, उपमहापौर धनंजय जाधव आदी उपस्थित होते.
‘केंद्र सरकारचा महत्त्वाचा असलेला ‘हर घर जल’ हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करायचा होता. मात्र, तो झालेला नाही. योजनेचा बट्ट्याबोळ उडालेला आहे, असे आपण बोलला होता,’ असे पालकमंत्री विखे-पाटील यांना विचारण्यात आले. यावेळी ‘योजना महत्त्वाची आहे हे बरोबर आहे. ती नाही पूर्ण झाली म्हणून काय आता पंतप्रधानांना इथं बोलवायचं काय?’ असा उलट प्रश्न करीत, ‘कामे पूर्ण झाली नाहीत, ही वस्तुस्थिती आहे,’ अशी कबुलीही त्यांनी जाहीरपणे दिली. ‘आता आपल्याला काम करून घ्यायचं आहे. त्यामुळे आता आगामी काळामध्ये योजना पूर्णत्वाला कशी जाईल, यासाठी आम्ही प्रयत्न करू,’ असे आश्वासनही त्यांनी दिले.
दरम्यान, ‘आमदार रोहित पवार यांचे आंदोलन म्हणजे केवळ स्टंटबाजी आहे,’ अशी टीका करीत, प्रसिद्धीसाठी त्यांचे कायम प्रयत्न असतात. मात्र, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावरही टीका करताना विखे म्हणाले, ‘हाके हे फक्त हाकत असतात. त्यांचे कोणी ऐकत नाही.’
Comments are closed.