ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा


जळगाव : भुसावळ (jalgaon) शहरातील 25 लाख 42 हजार रुपयांच्या लुटीचा उलगडा पोलिसांनी अवघ्या 48 तासांत केला असून या गुन्ह्यामागे ड्रायव्हरच मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले आहे. मोहम्मद यासीन हे 28 ऑक्टोबर रोजी त्यांच्या कार्यालयातील रोकड रक्कम एका बॅगेत घेऊन मोटरसायकलवरून घरी जात असताना, खडके शिवारातील सत्य साईनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांची मोटरसायकल थांबवून बॅग हिसकावून पळ काढला होता. या दरोड्याच्या घटनेनं जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली होती. अखेर, पोलिसांनी (Police) मिशन मोडवर ही मोहिम हाती घेतली, त्यामुळे 48 तासांच आरोपी आणि सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.

पोलिसांना प्राथमिक तपासादरम्यान यासीन यांचा ड्रायव्हर शाहीद बेग हाच गुन्ह्याचा सूत्रधार असल्याचे समोर आले. कंपनीत काम करत असल्याने त्याला पैशांच्या ने-आण वेळेची अचूक माहिती होती. पोलिसांनी शाहीद बेग इम्राहीम बेग, मुजाहिद आसिफ मलिक, मोहम्मद दानिश मोहम्मद हाशिम, अजहर फरीद मलक, अमीर खान युनिस खान आणि इजहार बेग इरफान बेग या सहा आरोपींना अटक केली असून 23 लाख 42 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सदर थैलीत 500 रुपयांच्या नोटांमध्ये 25 लाख रुपये तसेच ऑफिससाठी असलेले अतिरिक्त 42 हजार रुपये अशी एकूण 25 लाख 42 हजारांची रोकड होती. घटनेनंतर काही वेळातच भुसावळ तालुका पोलिसांनी परिसरात नाकेबंदी करून शोधमोहीम सुरू केली. मात्र आरोपी रात्रीच्या आडोशात पसार झाले.

याप्रकरणी फिर्यादी मोहम्मद यासीन मोहम्मद इस्माईल (वय 39, रा. सत्यसाई नगर, खडका रोड, भुसावळ) यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोहम्मद यासीन हे आपल्या मोटारसायकलवरून (क्रमांक MH 19 BC 5586) रात्री घराकडे परतत असताना सत्यसाई नगर येथील कॉम्प्लेक्सजवळील रस्त्यावर तिघा अनोळखी इसमांनी त्यांच्या दुचाकीला मुद्दाम धडक दिली. धडकेमुळे यासीन यांची निळ्या रंगाची चेन असलेली चौकोनी थैली खाली पडली. त्याच क्षणी आरोपींनी थैली बळजबरीने उचलून घेतली आणि अंधाराच्या दिशेने पसार झाले होते. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०२०७/२०२५ असा दाखल करण्यात आला असून, तो भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(४) आणि ३(५) अंतर्गत नोंदविण्यात आला आहे. तपासाची सूत्रे पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या हाती असून, आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि पुरावे तपासण्यात आले. त्यामुळे, 48 तासांच या चोरीचा उलगडा झाला.

हेही वाचा

लांडगा आला रे आला… पंचायत समिती आवारात 5 जणांवर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी

आणखी वाचा

Comments are closed.