जालन्यात 40 स्वयंचलित हवामान केंद्रांत छेडछाड, पर्जन्यमापकावर बर्फ ठेवून पावसाच्या खोट्या नोंदी
जालना : जालन्यात हवामान आणि पर्जन्यमापनाबाबत एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर गैरप्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील 49 स्वयंचलित हवामान केंद्रांपैकी तब्बल 40 केंद्रांमधील पर्जन्यमापक (Rain Gauge) उपकरणांमध्ये एकाच नव्हे, तर तब्बल चार वेळा छेडछाड करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अशिमा मित्तल (Ashima Mittal) यांनी दिली. प्रत्यक्षात पाऊस नसतानाही उपकरणांवर बर्फाचे तुकडे ठेवून आणि यंत्राच्या रिंग तोडून पावसाच्या खोट्या नोंदी दाखवल्याचे प्रशासनाच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
Weather Station Fraud Modus Operandi : अशी केली जायची छेडछाड
जालना जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस पडलेला नसतानाही हवामान केंद्रांच्या नोंदींमध्ये मोठा पाऊस झाल्याचे दिसून येत होते. या संशयास्पद नोंदींमुळे स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र शंका उपस्थित करत तक्रारी दाखल केल्या होत्या. प्रशासनाने तपासणी केली असता, अज्ञातांनी पर्जन्यमापक यंत्रांच्या रिंग तोडल्याचे आणि त्यावर बर्फाचे तुकडे ठेवून तो वितळल्यानंतर प्रत्यक्षात पाऊस झाल्याची खोटी नोंद यंत्रात निर्माण केल्याचे स्पष्ट झाले. या हवामान अंदाजावर शेतकऱ्यांची पुढील कामांची दिशा ठरत असल्याने, या खोट्या नोंदींमुळे शेतकऱ्यांची मोठी दिशाभूल होऊन शेतीचे नुकसान होण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे.
जालना आशिमा मित्तल कारवाई : फौजदारी कारवाईचे निर्देश
या गंभीर गैरप्रकाराची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी अशिमा मित्तल म्हणाल्या, “49 हवामान केंद्रांपैकी 40 ठिकाणी जवळपास चार वेळा छेडछाड झाल्याचे दिसून आले आहे. या पर्जन्यमापकांच्या अंदाजावर शेतकऱ्यांचे नियोजन अवलंबून असते, त्यामुळे या प्रकाराची अत्यंत गंभीर दखल घेण्यात आली आहे. यापुढे अशी छेडछाड झाल्यास अत्यंत कडक कारवाई केली जाईल.”
जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी पोलीस प्रशासनासोबत तातडीची बैठक घेतली असून, फौजदारी गुन्हे (Criminal Action) दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. आतापर्यंत 5 पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, पुढील काळात असा गैरप्रकार रोखण्यासाठी सर्व हवामान केंद्रांच्या ठिकाणी सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे लावण्यात येणार आहेत.
Crop Insurance And Relief : पीक विम्याचा संशय
स्वयंचलित हवामान केंद्रांच्या नोंदींचा थेट संबंध पिकांचे नुकसान, शासकीय मदत आणि पीक विमा (Crop Insurance) भरपाईशी असतो. त्यामुळे पर्जन्यमापकात अशी वारंवार खोटी नोंद दाखवून नक्की कोणाचा फायदा किंवा नुकसान करण्याचा कट रचला जात होता, याचा सखोल तपास आता पोलीस यंत्रणा करत आहे.
ही बातमी वाचा:
Comments are closed.