Jalna News – जवाहर नवोदय विद्यालयात 9 वीच्या विद्यार्थ्यावर रॅगिंग; 11 वीच्या 7 विद्यार्थ्यांना 8 दिवसांसाठी केले निलंबित

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जालना जिल्ह्यातील परतूर येथील आंबा रस्त्यावरील नामांकित ‘जवाहर नवोदय विद्यालयात’ रॅगिंग आणि अमानुष मानसिक छळाचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील इयत्ता ९ वीमध्ये शिकणाऱ्या एका निष्पाप विद्यार्थ्याला अकरावीच्या ७ विद्यार्थ्यांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या विद्यार्थ्यांनी पीडित मुलाला स्वतःचे कपडे धुण्यास भाग पाडून त्याचा तीव्र मानसिक व शारीरिक छळ केला. याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी थेट शिक्षण मंत्रालय, जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून विद्यालयाच्या अंतर्गत अँटी-रॅगिंग कमिटीने तात्काळ चौकशी करून दोषी आढळलेल्या सातही विद्यार्थ्यांना ८ दिवसांसाठी विद्यालयातून निलंबित केले आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील सराफ गव्हाण येथील रहिवासी संतोष शिवाजीराव कोल्हे यांचा मुलगा शिवराज हा या विद्यालयात इयत्ता ९ वीत शिक्षण घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यालयातीलच अकरावीच्या काही विद्यार्थ्यांकडून त्याचा सातत्याने छळ केला जात होता. चालू शैक्षणिक वर्षात शाळा पूर्ववत सुरू झाल्यानंतर ३ जुलै २०२६ पासून अकरावीच्या विद्यार्थ्यांनी त्याला पुन्हा लक्ष्य करण्यास सुरुवात केली. वरिष्ठ विद्यार्थी संगनमत करून शिवराजला त्रास देत होते, त्याच्याकडून बळजबरीने कपडे धुवून घेत होते आणि कुठलेही कारण नसताना त्याला बेदम मारहाण करत होते. इतर समवयस्क मित्रांसमोर त्याची टिंगल-टवाळी करून त्याचा सतत अपमान केला जात असल्यामुळे शिवराज अत्यंत भीतीच्या छायेखाली वावरत होता.

या सततच्या अमानुष त्रासाला आणि छळाला कंटाळून पीडित शिवराज प्रचंड मानसिक दडपणाखाली आणि नैराश्यात गेला. अखेर हा त्रास असह्य झाल्याने त्याने वडिलांना फोन करून आपल्याला घरी घेऊन जाण्याची आर्त हाक मारली. पालकांनी तात्काळ विद्यालयात धाव घेत शिवराजला घरी आणले आणि विचारपूस केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या रॅगिंग प्रकरणात इयत्ता ११ वी मधील सुमित काळे, श्रेयश कोरडे, पृथ्वीराज, दर्शन राठोड, कृष्णा शेळके, हर्षद काकडे आणि सम्राट खरात हे ७ विद्यार्थी दोषी आढळले आहेत. यापूर्वीही विद्यालयात अशा रॅगिंगच्या घटना घडल्या असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने न पाहिल्याने हा प्रकार वाढल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. पालकांनी ११ जुलै रोजी प्राचार्य, जिल्हाधिकारी, शिक्षण संचालक, केंद्रीय शिक्षण मंत्री आणि परतूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊन दोषींवर कठोर फौजदारी कारवाईची मागणी केली आहे.

या संपूर्ण प्रकरणावर बोलताना जवाहर नवोदय विद्यालय परतूरचे प्रभारी मुख्याध्यापक एस. जी. पवार यांनी सांगितले की, विद्यार्थ्याने सुरुवातीला भीतीपोटी शाळा प्रशासनाकडे थेट तक्रार केली नव्हती, मात्र पालकांनी तक्रार केल्यानंतर विद्यालयाच्या अंतर्गत अँटी-रॅगिंग कमिटीने तातडीने चौकशीची चक्रे फिरवली. या चौकशीत दोषी आढळलेल्या सातही विद्यार्थ्यांना प्राथमिक कारवाई म्हणून ८ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या धक्कादायक घटनेमुळे जालना जिल्ह्यातील निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलीस प्रशासन आणि शिक्षण विभाग आता या प्रकरणावर काय पुढील कायदेशीर पाऊल उचलणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.