मेस्सीच्या ‘20’ मागे एम्बाप्पे 007
>> मंगेश वरवडेकर
जेम्स बॉण्डच्या चित्रपटात एक दृश्य हमखास असते. पुढे शत्रू पळत असतो. मागे बॉण्ड. मध्ये गाड्या उडतात, पूल कोसळतात, गोळ्या सुटतात, पण बॉण्ड थांबत नाही. त्याची नजर फक्त लक्ष्यावर असते. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये किलियन एम्बाप्पेची अवस्था नेमकी तशीच आहे. फरक एवढाच की, त्याच्या हातात वॉल्थर पीपीके नाही, पायात फुटबॉलचे बूट आहेत आणि समोरचा माणूस कुणी खलनायक नाही. तो फुटबॉलच्या साम्राज्याचा राजा लिओनेल मेस्सी आहे.
लिओनेल मेस्सी 20 गोलांसह विश्वविक्रमावर विराजमान आहे. त्याच्या मागे एम्बाप्पे 19 गोलांवर आहे. मेस्सीच्या यंदाच्या स्पर्धेत सात गोल. एम्बाप्पेचेही सात गोल. म्हणजे एकाच वेळी दोन शर्यती सुरू आहेत. पहिली, यंदाच्या वर्ल्ड कपचा ‘गोल्डन बूट’ कोण घेणार? आणि दुसरी, वर्ल्ड कपच्या इतिहासातील गोलांच्या शिखरावर अखेर कोण झेंडा रोवणार? एका शर्यतीत दोघे खांद्याला खांदा लावून धावताहेत. दुसऱ्या शर्यतीत मेस्सी एक पाऊल पुढे आहे आणि एम्बाप्पे जेम्स बॉण्डसारखा त्याच्या सावलीवर पाय ठेवून धावतोय!
पॅराग्वेविरुद्धच्या अंतिम सोळाच्या लढतीत एम्बाप्पेने सत्तराव्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केला आणि फ्रान्सला 1-0 विजय मिळवून दिला. तो साधा गोल नव्हता. तो जणू मेस्सीच्या दारावर वाजवलेला गोळीबार होता. एम्बाप्पेने आपल्या वर्ल्ड कप कारकीर्दीतील 19 वा गोल अवघ्या 19 व्या सामन्यात केला. तो बॉण्डसारखा मागे पडलाय. तो त्यासाठी काहीही करू शकतो. तो बॉण्डसारखा प्रत्येक वेळी पॅसिनोत सूट घालून शॅम्पेन पीत बसत नाही. वेळ आली की चिखलात लोळून शत्रूचा पाठलाग करतो. एम्बाप्पेने पॅराग्वेविरुद्ध तेच केले, पण ज्याचा तो पाठलाग करतोय, तोही काही थकलेला म्हातारा राजा नाही. 39 वर्षांचा मेस्सी अजूनही गोलांच्या बाजारात तरुणांना उधारी देतोय! काबो व्हर्डेविरुद्ध अर्जेंटिनाच्या 3-2 विजयात त्याने वर्ल्ड कप कारकीर्दीतील 20 वा गोल केला. एवढेच नव्हे, तर सलग आठ वर्ल्ड कप सामन्यांत गोल करण्याचा पराक्रम त्याच्या नावावर आहे. ज्या वयात अनेक महान खेळाडू समालोचनाच्या खोलीत बसून ‘आमच्या काळात…’ सांगत असतात, त्या वयात मेस्सी अजूनही मैदानावर बचावपटूंना ‘तुमचा काळ संपला’ सांगतोय
मेस्सीचा वर्ल्ड कप प्रवास म्हणजे एका अपूर्ण प्रेमकथेचे महाकाव्यात झालेले रूपांतर. 2006 मध्ये तो लहानगा जादूगार म्हणून आला. 2010 मध्ये अपेक्षांचे ओझे घेऊन फिरला. 2014 मध्ये अर्जेंटिनाला अंतिम फेरीपर्यंत नेले, पण जर्मनीने स्वप्न हिरावले. 2018 मध्ये फ्रान्सने अर्जेंटिनाला बाहेर फेकले आणि त्या सामन्यातच जगाने एम्बाप्पे नावाच्या वादळाची गर्जना ऐकली. मग 2022 कतार. मेस्सीने सात गोल केले, अर्जेंटिनाला विश्वविजेते केले आणि कारकीर्दीतील सर्वात मोठी रिकामी जागा सोन्याने भरली. आता 2026 मध्ये तो पुन्हा सात गोलांवर आहे. म्हणजे राजा मुपुट घालून निवृत्तीची वाट पाहत नाही, तो मुपुटाला आणखी हिरे बसवतोय.
मेस्सीच्या वर्ल्ड कप कथेत जिथे एका युगाची परिपूर्णता आहे, तिथे एम्बाप्पेच्या कथेत एका साम्राज्याच्या विस्ताराची भूक आहे. 2018 मध्ये अवघ्या 19 व्या वर्षी त्याने चार गोल करत फ्रान्सला विश्वविजेते केले. अंतिम सामन्यात गोल केला आणि पेलेनंतर तरुण वयात जगाच्या सर्वात मोठय़ा मैदानावर अशी छाप सोडणाऱ्या मोजक्या महान खेळाडूंत स्थान मिळवले. 2022 मध्ये तर त्याने आठ गोलांसह ‘गोल्डन बूट’ जिंकला. अर्जेंटिनाविरुद्धच्या अंतिम सामन्यात हॅटट्रिक केली. मेस्सीने विश्वचषक उचलला, पण एम्बाप्पेने त्या रात्री पराभवातही स्वतःचा ध्वज रोवला. आता 2026 मध्ये सात गोल करत तो पुन्हा ‘गोल्डन बूट’च्या दारात उभा आहे.
याहून भन्नाट गोष्ट म्हणजे एम्बाप्पे आता तीन वेगवेगळ्या वर्ल्ड कपच्या बाद फेरीत किमान तीन गोल करणारा एकमेव खेळाडू ठरला आहे. मोठय़ा सामन्यांत काही खेळाडूंचे पाय थरथरतात, एम्बाप्पेच्या पायांना बहुधा बाद फेरी दिसली की भूक लागते. म्हणून ही शर्यत केवळ आकडय़ांची नाही. ती दोन काळांची आहे. मेस्सी म्हणजे जुन्या राजवाड्यात अजूनही तेजाने जळणारा झुंबर. एम्बाप्पे म्हणजे दार फोडून आत शिरणारी नवी वीज. मेस्सीने वर्ल्ड कपमध्ये पराभव, अश्रू, अंतिम फेरीतील वेदना, पुनरागमन आणि विश्वविजेतेपद असा संपूर्ण जीवनपट अनुभवला. एम्बाप्पेने मात्र आपल्या पहिल्याच वर्ल्ड कपमध्ये मुपुट घातला, दुसऱ्यात ‘गोल्डन बूट’ घेतला आणि तिसऱ्यात विक्रमांच्या तिजोरीचा पासवर्ड शोधायला सुरुवात केली.
सध्या ‘गोल्डन बूट’च्या शर्यतीत दोघे सात-सात गोलांवर आहेत. मागे नॉर्वेचा एर्लिंग हालांद आणि इंग्लंडचा हॅरी केन प्रत्येकी पाच गोलांसह आहेत. त्यामुळे ही शर्यत दोन घोडय़ांची आहे असे म्हणणे धोकादायक, पण सध्या प्रकाशझोत मात्र मेस्सी आणि एम्बाप्पेवरच आहे. अखेरीस गोलसंख्या समान राहिली तर सहाय्यक गोलांची संख्या आणि त्यानंतर कमी मिनिटांत केलेली कामगिरी निर्णायक ठरणार आहे.
Comments are closed.