अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
अहिल्यानगर : राज्यातील दूध पदार्थातील भेसळ ही अत्यंत चिंतेची बाब बनली असून अन्न व औषध विभागाकडून कारवाई देखील केली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांत दुधात भेसळ, पनीर किंवा तत्सम पदार्थांतील भेसळीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यातच, अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये अन्न व औषध विभागाने कारवाई करत दुध भेसळीचा पर्दाफाश केला. यापकरणी, पोलिसांनी दोघांना अटक केली असून दूध भेसळीचं साहित्य देखील जप्त केलंय.
अहिल्यानगरच्या अन्न औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दूध भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. जामखेड तालुक्यातील फकराबाद येथे एका शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये भेसळयुक्त दूध तयार करून चांगल्या दुधात मिक्स केलं जात होतं. या भेसळीची माहिती मिळताच अन्न औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस फकराबाद येथील शेतकऱ्यांच्या गोठ्यावर पोहोचले आणि दूध भेसळ करणाऱ्या शेतकऱ्यांसह भेसळीसाठी लागणाऱ्या साहित्यासह दोन जणांना जेरबंद केलं आहे. ग्रामीण भागातील शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय करतात यातून शेतकऱ्यांना चांगले पैसे देखील मिळतात. मात्र, याच व्यवसायाच्या आडून काही व्यापारी शेतकऱ्यांना हाताशी धरून भेसळयुक्त दूध तयार करतात.
भेसळ साहित्य जप्त
भेसळयुक्त दुधापासून पैसे मिळत असले तरी या दुधामुळे सेवन करणाऱ्याचे काय हाल होऊ शकतात आणि या भेसळीमुळे आपल्यावर होणाऱ्या दुष्परिणामाची यत्किंचितही भीती त्यांना वाटत नाही. अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यातील फकराबाद येथे एका शेतकऱ्याच्या गोठ्यावर रसायनापासून दूध तयार करण्याची प्रक्रिया केली जात होती. यात शेतकरी आणि व्यापारी यांचा सहभाग होता ही माहिती अन्न औषध प्रशासन आणि पोलीस विभागाला मिळाल्यानंतर पोलिसांनी थेट गोठ्यावर जात छापा टाकला, यात शेतकरी रामदास उबाळे आणि समीर शेख, आफताब सेफ या व्यापाऱ्यांना जेरबंद केलं आहे. एवढेच नाही तर त्यांच्याकडे दूध तयार करण्यासाठी असलेले 1200 लिटर लिक्विड पॅराफेन हे रसायन आणि आणखी काही रासायनिक पदार्थ जप्त केले आहेत.
गुंडांची पोलिसांनी काढली धिंड
शहरात भर चौकात गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या गुंडांची अहिल्यानगर पोलिसांनी अखेर ठोस कारवाई करत दहशत मोडून काढली. कोठला परिसरातील राज चेंबर भागात ट्रॅव्हल व्यावसायिकावर गोळीबार करून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणारा मुकुंदनगर येथील गुंड जैद सय्यद उर्फ टप्या आणि त्याच्या साथीदारांना तोफखाना पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे, हातात बंदूक घेऊन आरोपीने दहशत पसरवली होती, त्याच जागी पोलिसांनी थेट वरात काढत गुंडगिरीला खुलेआम चोख प्रत्युत्तर दिले. “गुंडगिरीला नगरमध्ये जागा नाही” असा ठाम संदेश या कारवाईतून देण्यात आला.
अहिल्यानगरमध्ये भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहर हादरले होते. व्यापारी, नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली होती…मात्र, पोलिसांच्या तात्काळ तपास, ठोस पुरावे आणि धडक कारवाईमुळे आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपीला अटक करून त्याच ठिकाणी वरात काढत पोलिसांनी कायद्याचा दरारा पुन्हा एकदा सिद्ध केला. या धडाकेबाज कारवाईनंतर अहिल्यानगर पोलीस प्रशासनाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असून, शहरात पुन्हा एकदा “कायदा सर्वोच्च” असल्याचा विश्वास बळावल्याचं दिसून येतं. नगरमध्ये गुंडगिरीला थारा नाही असा इशारा या कारवाईच्या माध्यमातून पोलिसांकडून देण्यात आला.
आणखी वाचा
Comments are closed.