INDvsSL: जसप्रीत बुमराहने रचला इतिहास! एकाच झटक्यात मोडले रोहित-विराटसह धोनीचे T20I रेकॉर्ड्स

जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये आज (१ ऑक्टोबर) पुरुष क्रिकेट संघाचे उपांत्य फेरीचे सामने रंगले. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करत सुवर्ण पदकाच्या लढतीत प्रवेश केला. दुसरा सामना भारत विरुद्ध श्रीलंका असा खेळला गेला, ज्यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मैदानावर पाऊल ठेवताच रोहित शर्मा, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार आणि एमएस धोनी यांचे विक्रम मोडले.

निशीनच्या कोरोगी पार्कवर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या नाणेफेकीनंतर बुमराहचे नाव अंतिम अकरामध्ये येताच, तो भारतासाठी सर्वाधिक देशांमध्ये टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू ठरला. यामुळे त्याने माजी कर्णधार विराट कोहली, भुवनेश्वर आणि रोहित शर्मा यांना मागे टाकले.

बुमराहने आतापर्यंत १३ देशांमध्ये टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने खेळण्याची कामगिरी केली आहे. त्याच्यानंतर आता विराट, रोहित आणि भुवनेश्वर असून तिघांनी प्रत्येकी १२-१२ देशांमध्ये भारतासाठी टी२० सामने खेळले आहेत.

बुमराहने जपानमध्ये टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याआधी भारत, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, आयर्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, यूएई, यूएसए, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे येथे किमान एक टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.

बुमराहाचा विक्रम न तुटणारा….
विराट, रोहित आणि भुवनेश्वर यांनी बुमराह जेथे खेळला तेथे जपान सोडून बाकी सर्व देशांमध्ये टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामुळे बुमराहचा हा विक्रम रोहित-विराट तर तोडू शकणार नाही, कारण ते टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत.

भुवनेश्वरची गोष्ट केली तर त्याची भारतीय संघात परतण्याची शक्यता कमी आहे. तसेच त्याला दोन देशांमध्ये भारतासाठी टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळावा लागेल, तेव्हा कुठे बुमराहचा विक्रम मोडला जाईल.

आता बुमराहने धोनीचा कोणता विक्रम मोडला, हा प्रश्न नक्कीच पडला असेल. तर बुमराहने भारतासाठी सर्वाधिक टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याच्या बाबतीत धोनीला मागे टाकले आहे. या यादीत रोहित १५९ सामन्यांसह पहिल्या स्थानी आहे, तर ९८ सामन्यांसह धोनी सहाव्या स्थानी होता. आता बुमराहने ९९ सामन्यांसह हे स्थान काबीज केले.

भारतासाठी सर्वाधिक टी२० आंतरराष्ट्रीय सामने
१५९ – रोहित शर्मा
138 – हार्दिक पांड्या
125 – विराट कोहली
113 – सूर्यकुमार यादव
106 – अक्षर पटेल*
99 – जसप्रीत बुमराह
98 – एमएस धोनी

श्रीलंका जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा त्यांना बुमराहच्या वादळाने घेरले. त्याने पहिल्याच षटकात एक धाव देत दोन विकेट्स घेतल्या. नंतर श्रीलंकेच्या विकेट्स पडतच राहिल्या. त्यांचा संपूर्ण संघ ९.५ षटकांत ४५ धावसंख्येवर गारद झाला आणि भारताने हा सामना १२४ धावांनी जिंकला.

सामन्याची स्थिती
या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले होते. भारताने वैभव सूर्यवंशीच्या ३८ आणि इशान किशनच्या नाबाद ८० धावांच्या जोरावर २० षटकांत ७ विकेट्स गमावत १६९ धावा केल्या होत्या.

Comments are closed.