968 दिवसानंतर परतलेल्या बुमराहची ऐतिहासिक कामगिरी! इंग्लंडमध्ये भारतासाठी 'अशी' कामगिरी करणारा…

भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यांची सुरूवात टी २० मालिकेने झाली, ज्यामध्ये भारताला ०-४ असे मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर सुरू झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी धमाकेदार सुरूवात करत चाहत्यांना दिलासा दिला आहे. हा सामना आज (१४ जुलै) एजबस्टन येथे सुरू आहे.

या सामन्यातून जसप्रीत बुमराह याने भारतीय संघात पुनरागमन केले. तो २०२३ च्या विश्वचषक अंतिम सामन्यानंतर संघात परतला असून त्याने पहिल्याच सामन्यात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे.

बुमराहने एजबस्टनमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरि ब्रूकला (१) बाद केले आणि आपल्या वनडे कारकिर्दीतील १५० विकेट्स पूर्ण केल्या. त्याचबरोबर तो इंग्लंडमध्ये भारतासाठी सर्वाधिक वनडे विकेट्स घेणारा गोलंदाजही ठरला आहे.

या स्टार वेगवान गोलंदाजाने इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यांमध्ये आतापर्यंत सर्वाधिक ३१ विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानी रवींद्र जडेजा आहे. त्याने ३० विकेट्स घेतल्या आहेत.

इंग्लंडमध्ये भारतासाठी सर्वाधिक वनडे विकेट्स घेणारे-
३१ – जसप्रीत बुमराह
30 – रवींद्र जडेजा
२८ – भुवनेश्वर कुमार
27 – मदन लाल
२६ – मोहम्मद शमी

सर्वात कमी चेंडूत १५० वनडे विकेट्स (भारत)
4070 – मोहम्मद शमी
४५१३ – कुलदीप यादव
४६०५ – जसप्रीत बुमराह
५०२७ – अजित आगरकर
५१३१ – इरफान पठाण

सामन्याची स्थिती
ब्रूकने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने पहिल्या १२ षटकांपर्यंत एकही विकेट गमावली नव्हती, मात्र नंतर भारताच्या वेगवान गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. गुरनूर ब्रारने याची सुरूवात केली. त्याने १३ व्या षटकात दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर लगेचच पुढच्या षटकात बुमराहने इंग्लंडला तिसरा धक्का दिला.

प्रसिद्ध कृष्णाही विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये सामील झाला. त्याने १७ व्या षटकांत इंग्लंडला एकापाठोपाठ दोन धक्के दिले. जोस बटलर, जो आपल्या कारकिर्दीतील २०० वा वनडे सामना खेळत होता, तो ५ धावा करत बाद झाला. सॅम करन तर खातेही न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यामुळे इंग्लंडने १७ षटकांत ८० धावसंख्येवरच अर्धा संघ गमावला आहे.

Comments are closed.