जसप्रीत बुमराहने मुंबई इंडियन्सचं उपकर्णधारपद नाकारलं? मोठा खुलासा समोर
मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पुन्हा एकदा रोहित शर्माकडे (Rohit Sharma) संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. 2023 नंतर रोहितला कर्णधारपदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर हार्दिक पांड्याच्या (Hardik pandya) नेतृत्वाखाली मुंबईने तीन हंगाम खेळले. यापैकी दोन हंगामांत संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. केवळ कामगिरीच नाही, तर हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचे खेळाडू एकत्र नव्हते, अशाही बातम्या समोर आल्या होत्या.
ड्रेसिंग रूममध्ये मतभेद असल्याच्या चर्चाही झाल्या होत्या. आता फ्रँचायझीने पुन्हा एकदा रोहितकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे. दरम्यान, जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) उपकर्णधारपदाची ऑफर देण्यात आली होती, मात्र त्याने ती नाकारल्याची बातमी समोर आली आहे.
समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स सोडून जाणार असल्याची अधिकृत माहिती समोर येण्यापूर्वीच, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबई इंडियन्सने रोहितकडे पुन्हा कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार निवडताना संघाने सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नावाचा विचार केला नाही. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली याच वर्षी भारताने टी-20 विश्वचषक जिंकला होता. तसेच जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांचाही या पदासाठी विचार करण्यात आला नाही.
मुंबई इंडियन्समध्ये सध्या उपकर्णधारपदासाठी कोणत्याही खेळाडूची निश्चित नियुक्ती नाही. मात्र, कर्णधार अनुपस्थित असल्यास संघाची जबाबदारी सांभाळण्यासाठी अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडूची गरज असते. मागील हंगामात हार्दिक पांड्या अनुपस्थित असताना सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी आलटून-पालटून संघाचे नेतृत्व केले होते.
जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्सच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर तो सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता ठेवतो. फ्रँचायझीने 2025 च्या मेगा लिलावापूर्वी त्याला 18 कोटी रुपयांत संघात कायम ठेवले होते. दुसरीकडे, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी मुंबई इंडियन्ससोबत कायम राहण्यासाठी आपल्या मानधनात कपात केली होती.
समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने बुमराहला उपकर्णधारपदाची ऑफर दिली होती. मात्र, बुमराहने नम्रपणे ही ऑफर नाकारली. त्याने हा प्रस्ताव का नाकारला, याचे नेमके कारण त्यालाच माहीत आहे. मात्र, मागील हंगामात कर्णधाराच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करण्याची वेळ आली होती, तेव्हा त्याने एक रंजक विधान केले होते.
बुमराह म्हणाला होता, मुंबई इंडियन्सचा कर्णधार होण्यापूर्वी मी भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार होईन, असा मी कधीच विचार केला नव्हता.
Comments are closed.