काही पैलवानांना मैदानात फिरुन बक्षीस घेऊन जायची सवय असते, गोरेंनी मोहिते पाटलांना डिवचलं


जयकुमार गोरे : काही वेळा डोळ्यात माती टाकून कुस्ती जिंकता येते. मात्र, त्या अनुभवातून आम्ही चांगले शिकलो असून पुन्हा तयारीने मैदानात उतरत असल्याचा टोला सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore )  यांनी मोहिते पाटील यांचे नाव न घेता लगावला. ते आज माळशिरस येथे बोलत होते. काही लोकांना अनेक वेळा जीवदान दिले.  पण यामुळं त्यांना या जीवदानाचा अहंकार झाला आणि त्यांना वाटू लागलं की ही ताकद आमची आहे असे गोरे म्हणाले.

काही पैलवानांना मैदानात नुसतं फिरवून बक्षीस घेऊन जायची सवय असते

काही पैलवानांना मैदानात नुसतं फिरवून बक्षीस घेऊन जायची सवय असते. त्यांना लढाईची सवय नसते. पण त्यांची अजून कसलेल्या पैलवानाशी भेट झालेली नाही. ज्यावेळी होईल त्यावेळेला समजेल असे सांगत काही वेळेला डोळ्यात माती टाकून जिंकता येते ते आमच्या निंबाळकरांच्या बाबतीत झाले. पण आता आम्ही यातून सर्व शिकून पुन्हा लढायला मैदानात उतरलो आहे. आम्ही रडणारे नाही तर लढणारे आहोत असा टोलाही गोरे यांनी लगावला. आज सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथे मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक आणि माजी आमदार स्वर्गीय शामराव पाटील यांच्या कुटुंबीयांनी आज जाहीर कार्यक्रमात शक्ती प्रदर्शन करीत भाजपमध्ये प्रवेश केला. स्वर्गीय माजी आमदार शामराव पाटील यांचे पुत्र आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाशराव पाटील यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमात जयकुमार गोरे यांनी जोरदार बॅटिंग केली.

मुख्यमंत्र्यांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करेपर्यंत मी कुठेही जात नाही आणि ऑपरेशन लोटसही थांबणार नाही

पंचायत राज निवडणुका सुरुवात झालेल्या असताना पुन्हा एकदा ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करेपर्यंत मी कुठेही जात नाही आणि ऑपरेशन लोटसही थांबत नाही असे सांगत पुन्हा विरोधी पक्षांना चिंतेत टाकले आहे. आता सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याच तालुक्यात अडचण राहिलेली नाही असे सांगताना अजूनही चांगल्या विचाराची अनेक नेते भाजपमध्ये येत आहेत त्यांनाही प्रवेश घेण्यात येणार असल्याचे गोरे यांनी सांगितले. जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर दिलेली जबाबदारी पूर्ण होत नाही तोपर्यंत ना ऑपरेशन लोटस थांबेल ना मी थांबेल असा इशारा विरोधकांना दिला. जयकुमार गोरे यांचे पालकमंत्री पद बदलणार अशा पद्धतीच्या अफवा उठवल्या जात आहेत. याबद्दल बोलताना काही जण वाट पाहत आहेत. आज होईल उद्या होईल पण असे काहीही होणार नाही. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी कुठेही जात नसतो असा टोला गोरे यांनी लगावला.

आणखी वाचा

Comments are closed.