NTAचे DG असणाऱ्या IAS सुबोध कुमार सिंह बक्षीस का? NEET पेपरफुटीवर जयंत पाटील भडकले
मुंबई : देशभरात डॉक्टरकीची (Doctor) स्वप्न पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या अपेक्षांवर पुन्हा एकदा पाणी फिरलं असून शासनाकडून यंदा घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. NEET परीक्षेचा (NEET) पेपर फुटल्याने, प्रश्नपत्रिका 48 तास अगोदरच व्हायरल झाल्याने परीक्षेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले होते. त्यानंतर, एनटीएकडून परीक्षाच रद्द करण्यात आली असून आता नव्याने ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी देखील 2024 मध्ये नीटचा पेपर फुटला होता. मात्र, या परिक्षेची जबाबदारी असलेल्या NTA प्रमुखांना अशा चुकांसाठी बक्षीस दिलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant patil) यांनी केला आहे.
जयंत पाटील यांनी नीट परीक्षेवर संतप्त प्रतिक्रिया देत, हे वारंवार घडत असल्याचं म्हटलं. भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणारे विद्यार्थी दहावीचा निकाल लागताच NEET च्या परीक्षेच्या तयारीला लागतात. सलग दोन वर्ष मेहनत करून बारावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थी लगेच ही NEETची परीक्षा देतात. पण यंदाचा पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. यंदाच्या वर्षी म्हणजेच 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आता, ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा या परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. यात विद्यार्थ्यांना मानसिक त्रास तर आहेच पण त्यासोबतच पालकांनाही त्रास सहन करावा लागणार आहे. प्रश्न फक्त पेपर फुटीचा नाही तर शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाचा आहे, असे म्हणत शिक्षण व्यवस्था आणि नॅशनल टेस्टींग एजन्सीच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
सुबोध कुमार सिंहांना बक्षीस का?
यापूर्वी 2024 साली देखील अशाच पद्धतीने पेपर फुटला होता. महत्वाच्या परीक्षांचे पेपर वारंवार फुटतातच कसे? विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर आतापर्यंत काय कारवाई झाली? NTAचे DG असणाऱ्या IAS सुबोध कुमार सिंह यांना तात्पुरते पदावरून काढले गेले. पण, नंतर लगेच त्यांना स्टील मंत्रालयात रुजू करण्यात आले आणि आता ते छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत. म्हणजे ही जी यंत्रणा चुक करते, काही पैशांसाठी लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा जुगार करते, त्यांना बक्षिसे मिळतात पण विद्यार्थ्यांना आणि पालकांना काय मिळतं? असा सवाल जयंत पाटील यांनी विचारला आहे. तसेच, विद्यार्थी आणि पालकांना फक्त त्रासच मिळत असल्याचं पाटील यांनी म्हटलं.
हेही वाचा
नाशिक ते हरियाणा…. NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
आणखी वाचा
Comments are closed.