जळक्या घरातली पाटीलकी, वैभवसंपन्न दगाबाज नेता म्हणजे जयंत पाटील; सदाभाऊ खोतांची बोचरी टीका

सांगली : महायुतीमध्ये (Mahayuti) जाण्याचे सर्व दरवाजे बंद झाल्यानेच काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येण्याचे वातावरण सुरु केले आहे. पण, ही जळक्या घरातली पाटीलकी फार काळ चालत नसते, अशी टीका माजी मंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर केली. काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येणार असल्याच्या चर्चेवरुन आता सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी काँग्रेससह मविआवर टीकेची झोड उठवली आहे. सदाभाऊ खोत सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी, त्यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant patil) आणि शक्तिपीठ महामार्गावरुन सुरू असलेल्या आंदोलनावरही भाष्य केलं.

जयंत पाटील हे राज्यामध्ये विश्वासार्हता संपलेले नेतृत्व आहे, महाराष्ट्रातल्या राजकारणातला वैभवसंपन्न दगाबाज नेता म्हणजे जयंत पाटील असा टोलाही सदाभाऊंनी यावेळी लगावला. तळ्यातले पाणी आटल्यावर मासे उघडे पडल्यावर जसे तडफडतात तसे हे महाविकास आघाडीचे राजकारणी सत्तेच्या तळ्याचे पाणी आटल्यामुळे तडफडत असल्याची टीका सदाभाऊनी यावेळी केली. तर, साताऱ्याचे दोन्ही राजे विधानपरिषद उमेदवारीवरून नाराज आहेत, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले होते. त्यावरुन, पलटवार करताना सदाभाऊ खोत म्हणाले की, जयंत पाटलांना दुसऱ्याच्या घरात वाकून बघायची सवय आहे. जे काही घडतं ते माझ्यामुळेच असा त्यांचा फार दिवसापासूनचा समज आहे. या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होईल, असा विश्वास सदाभाऊंनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ सगळ्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे. रोहित पवार यांच्या शेतकरी आंदोलनावर बोलताना ते म्हणाले की, आता असा एक आंदोलनाचा विषय घ्यायला हवा की, शेतकऱ्यांचे जे सहकारी साखर कारखाने खासगी लोकांनी विकत घेतले ते पुन्हा शेतकऱ्यांच्या मालकीचे करा. अनेक कारखान्यानी शेतकऱ्यांना FRP दिली नाही ती मिळवून देण्याचे आंदोलन तुम्ही करावं, असा सल्लाच सदाभाऊंनी रोहित पवारांना दिला. तर, शक्तिपीठ महामार्ग नको म्हणून शेतकरी व राजू शेट्टी  यांचे आंदोलन सुरु आहे, त्यावर बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की सरकारशी चर्चा करून यावर मार्ग काढावा, मला राजू शेट्टींबद्दल आदरच आहे, असेही त्यांनी म्हटले.

शक्तिपीठ महामार्गावरुन सदाभाऊंची प्रतिक्रिया

शक्तिपीठ महामार्गाला विरोध जरूर करावा, मात्र आंदोलकांनी सरकारशी चर्चाही करावी, चर्चेतून मार्ग निघू शकतो, असे म्हणत शक्तिपीठ महामार्गावरुन सुरू असलेल्या आंदोलनावर सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच, आंदोलन करण्याचा आणि सरकारकडे मागणी करण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यामुळे आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांनी सरकारशी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा, असेही सदाभाऊ यांनी सूचवलं आहे.

हेही वाचा

धडक कारवायानंतर तुकाराम मुंढेंना धमक्या, सपोर्टसाठी शेतकरी मैदानात; आटपाडीत प्रतिमेला दुग्धाभिषेक

Comments are closed.