ज्या लोकांना भविष्य दिसत नाही ते इकडे तिकडे जातील; पक्षप्रवेशावेळी नेमकं काय म्हणाले जयंत पाटील

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांची महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant patil) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत पक्षाच्या आगामी उपक्रमांसाठी आणि निवडणूक रणनीतीसाठी विस्तृत रूपरेषा ठरविण्यात आली. या बैठकीला राज्यभरातून वरिष्ठ नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. जयंत पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाची तातडीची रणनीती स्पष्ट केली. त्यांनी सर्व जिल्हा व तालुका स्तरावरील यंत्रणांना बुथस्तरावर बळकट करण्याचे आवाहन केले. तर, लातूर जिल्ह्यातील काही पक्षप्रवेश पार पडले, त्यांचे स्वागत करत जयंत पाटील यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. ज्या लोकांना भविष्य दिसत नाही ते इकडे तिकडे जातील पण आपण आदरणीय शरद पवारांचा (Sharad pawar) विचार घेऊन आपण काम करत आलोय, पुढेही करत राहू, असे पाटील यांनी म्हटले.

जयंत पाटील यांच्या उपस्थितीत लातूर येथील माजी जि. प. सदस्य माधव जाधव, जिल्हा सरचिटणीस इमरोज पटवेगर, माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती श्याम देवकत्ते, शिवशंकर आगलावे, गिरीधर पौळ, नवनाथ जाधव, माजी सरपंच बालाजी सोनवणे व इतर कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. त्यावेळी बोलताना पाटील यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांना टोला लगावला. “हा पक्ष सोडणार, तो पक्ष सोडणार असं काही लोक म्हणतायत पण ज्या लोकांना भविष्य दिसत नाही ते इकडे तिकडे जातील पण आपण आदरणीय शरद पवार साहेबांचा विचार घेऊन आपण काम करत आलोय, पुढेही करत राहू,” असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला. तसेच, सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळात विविध शासकीय कार्यालयांमध्ये चाललेल्या प्रचंड भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याची गरज आहे व ती भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पार पाडावी, असेही त्यांनी म्हटले.

पक्षसंघटनेत फेररचनेचे संकेत

पक्षातील नवीन पिढीला सक्षम करण्याच्या उद्देशाने, पक्ष युवक व महिला आघाड्यांचे बळकटीकरण करणार आहे व नवोदित व उत्साही स्वयंसेवकांना मोठ्या प्रमाणावर पक्षात सहभागी करून घेतले जाणार आहे. पक्षातील वरिष्ठ पातळीवरील नेते मंडळी संपूर्ण राज्यभर लवकरच दौरे करणार आहेत व जिल्हा तालुका स्तरावरील पक्ष संघटनेचा व शासकीय स्तरावरील  योजनांचा आढावा घेणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, तरुणांमधील बेरोजगारी आणि जनतेच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या इतर महत्वाच्या मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. पक्ष संघटनेत आवश्यकतेप्रमाणे फेररचनेचे संकेतही जयंत पाटील यांनी दिले. नव्या जबाबदाऱ्या, नव्या नियुक्त्या व आवश्यकतेनुसार पुनर्रचना करून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले.

हेही वाचा

भारताचा गोल्डन बॉय बनला लेफ्टनंट कर्नल; राष्ट्रपतींकडून नीरज चोप्राला सैन्य दलात मोठी जबाबादारी

अधिक पाहा..

Comments are closed.