स्वतःच्या राजकीय पुनर्वसनासाठी दादांच्या मृत्यूचं भांडवल करू नका; जयकुमार गोरेंचा रोहित पवारांव
रोहित पवारांवर जयकुमार गोरे: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघाताबाबत घातपाताचा संशय व्यक्त करत तज्ज्ञ समितीद्वारे चौकशीची मागणी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी जोरदार टीका केली आहे. “स्वतःच्या राजकीय पुनर्वसनासाठी दादांच्या मृत्यूचे भांडवल करू नका,” असा थेट इशारा गोरेंनी दिलाय.
रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांच्या विमान अपघातामागे घातपात असू शकतो, असा खळबळजनक दावा केला होता. या प्रकरणी तज्ज्ञ समिती नेमून सखोल चौकशी करावी, तसेच फौजदारी गुन्हा दाखल करून तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. अपघातग्रस्त विमान चालवणाऱ्या ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनीच्या मालकांचे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांशी आणि त्यांच्या पक्षाशी ‘मैत्रीपूर्ण’ संबंध असल्याचा आरोप करत निष्पक्ष चौकशीबाबत शंका उपस्थित करण्यात आली होती.
Jaykumar Gore on Rohit Pawar: गोरेंचा रोहित पवारांवर निशाणा
यावर प्रतिक्रिया देताना जयकुमार गोरे म्हणाले, अजितदादा खूप मोठे नेते होते. त्यांच्या जाण्याचे दुःख अवघ्या महाराष्ट्राला आहे. मात्र, या अपघाताचे काही लोक राजकारण करीत आहेत आणि त्यातून स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो त्यांना लखलाभ हो. मात्र, एवढा मोठा अपघात झाला, एवढे मोठे नेतृत्व आपल्यातून गेले. या अपघाताचे भांडवल करून आपल्या स्वतःच्या राजकीय पुनर्वसनाच्या संधी शोधणे उचित नाही, अशी टीका त्यांनी केलीय.
Jaykumar Gore on NCP Merger: राष्ट्रवादी विलिनीकरणावर काय बोलले जयकुमार गोरे?
जयकुमार गोरे पुढे म्हणाले की, सर्वांनी परिस्थितीचे भान ठेवले पाहिजे. या दुर्दैवी मृत्यूचे भांडवल न करता चौकशी एजन्सींना सहकार्य केले पाहिजे. लोकांच्या मनात वेगवेगळ्या शंका निर्माण होतील, असे कृत्य कोणी केले नाही पाहिजे, असा सल्ला देखील जयकुमार गोरे यांनी दिला आहे. तर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांबाबत विचारले असता जयकुमार गोरे म्हणाले की, दोन राष्ट्रवादी एकत्रित येणे, हा त्यांचा अंतर्गत भाग असून सध्याची प्राप्त परिस्थिती पाहता, असे काहीही घडले, असे आपल्याला वाटत नसल्याची प्रतिकिया त्यांनी दिली आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.