सराफा दुकानावर भरदिवसा दरोडा, सोलापुरात खळबळ; पिस्तुलाच्या धाकाने दागिने लुटले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सोलापुरातील गजबजलेल्या 70 फुटी रोडवरील ‘शिवकुमार ज्वेलर्स’ या सराफा दुकानावर तीनजणांच्या टोळीने पिस्तुलाचा धाक दाखवत भरदिवसा दरोडा टाकून दागिने लुटून नेले. सराफाला लुटण्याची ही दुसरी घटना आहे. यामुळे सराफ व्यापारी व नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

सोलापूर शहरातील 70 फुटी रोडवरील इंदिरानगर येथे ‘शिवकुमार ज्वेलर्स’ नावाचे दुकान आहे. सकाळी सव्वाअकराच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी सराफाला पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवला. त्यामुळे सराफ आरडाओरडा करत दुकानातून पळून गेला. या आरडाओरडय़ामुळे चोरट्यांनी हाताला लागतील तेवढे दागिने लुटून दुचाकी तेथेच सोडून पळ काढला. दुकानाबाहेर त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, पिस्तुलाचा धाक दाखवत त्यांनी धूम ठोकली. या घटनेने 70 फुटी रोडवर एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर-पाटील, पोलीस निरीक्षक बंडगर यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेने सराफा व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी अक्कलकोटजवळील जेऊर गावाजवळ एका सराफा व्यापाऱ्याला लुटण्यात आल्याची घटना घडली होती. दरोडेखोर सराफ व्यापाऱ्याला लक्ष्य करत असल्याच्या घटनेने घबराट पसरली आहे.

Comments are closed.