धारावी ताब्यात घेण्यासाठी गुंडांच्या फौजा बाळगल्यात का? अदानींनी टाटा-अंबानींसारखे वागावे, दाऊदसारखे नाही! संजय राऊत यांचा घणाघात
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली धारावीमध्ये सध्या दडपशाही आणि अत्याचार सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. धारावीचे निष्ठावंत माजी आमदार आणि सामाजिक कार्यकर्ते बाबुराव माने यांची 32 वर्षे जुनी व्यायामशाळा (जीम) शुक्रवारी रात्री कोणत्याही नोटीसशिवाय बुलडोझर लावून तोडण्यात आल्याची धक्कादायक माहिती संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. या कृत्यामागे उद्योगपती गौतम अदानी यांच्या गुंडांचा हात असल्याचा थेट आरोप त्यांनी केला.
रविवार मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी अदानींच्या गुंडेशाहीवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, स्थानिक पातळीवर बाबुराव माने हे धारावी बचाव या आंदोलनाचे नेतृत्व करतायत. तेथील छोटे उद्योजक, रहिवाशांच्या हक्कासाठी लढा देत आहेत, म्हणूनच त्यांच्या संस्थांना टार्गेट केले जात आहे. हा अत्यंत गंभीर आणि प्रत्येक मराठी माणसाच्या काळजात कट्यार खुपसणारा हा विषय आहे. जीम तोडल्यानंतर आता मनोहर जोशींच्या नावाने असलेली त्यांची शाळा आणि मैदानही अदानींना ताब्यात घ्यायचे आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत पुढे म्हणाले की, बुलडोझर कारवाईबाबत आम्ही पोलिसांना विचारले तर ते म्हणतात आम्ही काही केले नाही, एसआरएचे प्रमुख महेंद्र कल्याणकर आणि म्हाडाचे अधिकारीही हात वर करत आहेत. मग रात्रीच्या अंधारात जेसीबी आणि बुलडोझर घेऊन घुसलेले ते गुंड कोण होते? अदानींनी धारावी ताब्यात घेण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉनला सुपाऱ्या दिल्यात का, की पाकिस्तानातून गुंड आणलेत?” असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. या गुंडांची नावे आपल्याकडे असून ती लवकरच पोलीस आयुक्तांना देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“आता गरज पडल्यास 1006 मरतील…”
गौतम अदानींवर हल्लाबोल करताना संजय राऊत म्हणाले, “अख्खा देश ताब्यात घेतल्यानंतर आता अदानींना गोरगरीब सामाजिक कार्यकर्त्यांच्या संस्थाही गिळायच्या आहेतमोदी फ्रान्सला गेलेत आणि पाठोपाठ अदानीही पोहोचतील एखादं कॉन्ट्रॅक्ट घ्यायला. अख्ख जग ताब्यात घ्या पण गरीबांची धारावी का गिळताय? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. अदानींन स्वतःला उद्योगपती समजावे आणि रतन टाटा, मुकेश अंबानी किंवा बिर्ला यांच्यासारखे आदराने वागावे. त्यांनी गुंडांच्या टोळीच्या प्रमुखासारखे वागू नये. जर ते दाऊत इब्राहिम किंवा छोटा शकीलसारखे वागणार असतील, तर आम्ही छातीवर गोळ्या झेलायला तयार आहोत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 हुतात्मा झाले होते, आता गरज पडल्यास 1006 मरतील, पण हा अन्याय सहन करणार नाही.हे गौतम अदानींनी समजून घ्याव, असे संजय राऊत म्हणाले.
भाजपच्या मराठी नगरसेवकांनी राजीनामे द्यावेत!
या संपूर्ण प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत? असा प्रश्न विचारत संजय राऊत यांनी भाजपवरही निशाणा साधला. मुंबईतील मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचे हे कारस्थान सुरू आहे. मुख्यमंत्री आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जर मराठी रक्ताचा एक जरी थेंब असेल, तर त्यांनी अदानींना जाब विचारला पाहिजे. मुंबईतील मराठी माणसाची मला चिंता वाटतेय. भाजपमध्ये जर कोणी मराठी नगरसेवक असतील आणि त्यांच्यात स्वाभिमान असेल, तर त्यांनी तातडीने आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत, असे आवाहनही संजय राऊत यांनी केली.
Comments are closed.