दिव्यांगांच्या बोगस प्रमाणपत्रावर नोकरी, भंडाऱ्यात महसूल विभागाच्या सात कर्मचाऱ्यांवर कारवाई

भंडारा: दिव्यांगांची बोगस प्रमाणपत्र तयार करुन त्यावर शासकीय नोकरी लाटणाऱ्या महसूल विभागातील सात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनं भंडारा जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भंडारा जिल्ह्यातील विविध विभागात दिव्यांगांच्या बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर शासकीय नोकरी बळकाविणाऱ्यांची विशेष समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली होती.

महसूल विभागातील सात कर्मचारी यात दोषी आढळून आल्यानं जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी त्यांच्यावर ही कारवाई केली. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये भंडाऱ्याचे नायब तहसीलदार आनंद हट्टेवार, तीन तलाठी, एक मंडळ अधिकारी, दोन सहाय्यक महसूल अधिकारी यांचा समावेश आहे. भंडारा येथील नायब तहसीलदार आनंद हट्टेवार यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावं, असा प्रस्ताव जिल्हा निवड समितीच्या वतीनं शासनाकडे पाठवण्यात आला आहे. प्रशासकीय स्तरावर एवढ्या वरिष्ठ पदाच्या अधिकाऱ्यावर अशा प्रकारची कारवाई झाल्यानं महसूल विभागात चांगलीच चर्चा रंगली आहे.

बडतर्फ करण्यात आलेले अधिकारी कोणते?

1) वसुंधरा वासनिक – इंगळे – मंडळ अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा (पुनर्वसन शाखा).
2) शारदा सूर्यभान झंझाड – तलाठी (मोहाडी)
3) विनोड भावे – तलाठी (मोहाडी)

निलंबित झालेल्या अधिकाऱ्यांची नावे

1) शिवशंकर साखरवाडे – सहाय्यक महसूल अधिकारी.
2) योगराज बाबूराव डांगरे – तलाठी (लाखनी).
3) दिलीप सिंग भरतसिंग ठाकूर – सहाय्यक महसूल अधिकारी (पवनी)

भंडारा जिल्ह्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून अनेक जणांनी शासकीय नोकऱ्या मिळवल्याचा आणि पदोन्नती घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत भंडारा जिल्ह्यातील 23 कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. तसेच दोषींवर कारवाईची मोहीम सुरु करण्याचेही निर्देश दिले होते. त्यानुसार दिव्यांगांची बोगस प्रमाणपत्र तयार करुन त्यावर शासकीय नोकरी लाटणाऱ्या महसूल विभागातील सात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनं भंडारा जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.