सचिनच्या विक्रमाकडे रुटचं मार्गक्रमण… 15,921 धावांचा विक्रम ज्यो रुट मोडणार?

जो रूट सचिन तेंडुलकर रेकॉर्डकडे जाण्याचा प्रवासः टीम इंडियाचा (Team India) महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) 2013 साली जेव्हा निवृत्त झाला तेव्हा त्याच्या नावावर असे अनेक विक्रम होते जे मोडीत काढणं अशक्य होतं. आजही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली सर्वाधिक शतकं, सर्वाधिक कसोटी शतकं, सर्वाधिक वन डे आणि कसोटी धावा असे अनेक मोठमोठे विक्रम सचिनच्याच नावावर आहेत. हे विक्रम कोण मोडू शकतो? निवृत्तीनंतर आयोजित एका कार्यक्रमात सलमान खाननं हा प्रश्न सचिनला विचारला होता. तेव्हा सचिननं दोन नावं पुढे केली होती… ती होती, विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma).

सचिनच्या शब्दाचा मान राखत या दोघांनी आपल्या क्रिकेट कारकीर्दीत मैलाचे अनेक दगड पार केले. वन डेत दहा हजार धावा करुन दोघांनीही सचिनच्या पंगतीत स्थान मिळवलं. रोहितनं तीन वेळा वन डेत द्विशतक झळकावलं. विराटनं सचिनचा सर्वाधिक वन डे शतकांचा विक्रम मोडीत काढला. पण आता सचिनच्या 17 वर्ष अबाधित विक्रमाच्या मागावर आहे एक इंग्लिश खेळाडू. ३५ वर्षांचा ज्यो रुट.

मॅन्चेस्टर कसोटीत ज्यो रुटनं पहिल्या डावात 150 धावांची दमदार खेळी केली. या खेळीसह कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत थेट दुसरं स्थान गाठलं. एकाच खेळीत रुटनं राहुल द्रविड, दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस आणि ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगला मागे टाकलं. आणि आता रुटचं मार्गक्रमण सुरु झालंय ते कसोटी क्रिकेटमधला धावांचा एव्हरेस्ट गाठण्याच्या दिशेनं. अर्थात सचिन तेंडुलकरच्या 15,921 धावांचा विक्रम मोडण्याच्या दिशेनं.

2008 साली ब्रायन लाराला मागे टाकत सचिननं कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळवला. तेव्हापासून गेली 17 वर्ष तो विक्रम अजूनही अबाधित आहे. सचिननं 2013 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच्या अवघ्या एक वर्ष आधी रुटनं कसोटी पदार्पण केलं होतं. सचिनच्या निवृत्तीवेळी रुट अवघा 23 वर्षांचा होता. पण आज 13 वर्षांनी रुट जगातल्या अव्वल कसोटी फलंदाजांपैकी एक आहे.

Joe Root Journey Towards Sachin Tendulkar Record: सचिनच्या विक्रमाकडे रुटचं मार्गक्रमण... 15,921 धावांचा विक्रम ज्यो रुट मोडणार?

वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी ज्यो रुटचा क्रिकेट प्रवास सुरु झाला. घरात खेळाचं वातावरण असल्यानं रुटचे क्रिकेट स्किल्स दिवसेंदिवस बहरत गेले. ज्यो रुटचा भाऊ बिली हा सुद्धा प्रोफेशनल क्रिकेटर आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन जिथे घडला त्याच शेफिल्ड कॉलेजिएट क्रिकेट क्लबमध्ये रुटचा क्रिकेटचा अभ्यास सुरु झाला. वयोगटातल्या क्रिकेटमध्ये रुटची फलंदाजी बहरत होती. अंडर 11, अंडर 13, अंडर 15, अंडर 17 अशा प्रत्येत वयोगटात रुटनं जबरदस्त कामगिरी बजावली. त्यामुळे 2009 साली देशाच्या अंडर नाईन्टिन संघातही त्यानं झेप घेतली. आणि अवघ्या तीन वर्षात इंग्लंडच्या कसोटी संघातही स्थान मिळवलं.

2012 साली भारताविरुद्धच्या नागपूर कसोटीत रुटनं आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. पहिल्याच कसोटीच्या पहिल्या डावात 21 वर्षांच्या रुटनं खणखणीत अर्धशतक झळकावलं. पुढे रुट हा इंग्लंडच्या मधल्या फळीचा कणा बनला. 2015 साली इंग्लंडनं अशेस मालिका जिंकली त्या मालिकेत रुटनं सर्वाधिक धावा झळकावल्या. अलिस्टर कूकच्या निवत्तीनंतर 2017 साली कर्णधारपदाची धुराही रुटच्या खांद्यावर आली. 2022 पर्यंत त्यानं ही जबाबदारी पेलली.

Joe Root Journey Towards Sachin Tendulkar Record: सचिनच्या विक्रमाकडे रुटचं मार्गक्रमण... 15,921 धावांचा विक्रम ज्यो रुट मोडणार?

साल 2020 पर्यंत कसोटी क्रिकेटमधल्या फॅब्युलस फोरमध्ये ज्यो रुटची वर्णी लागलीच होती. पण तेव्हा विराट कोहली टॉपवर होता. स्टीव्ह स्मिथ आणि केन विल्यमसन देखील चांगल्या फॉर्ममध्ये होते. रुटच्या खात्यात तेव्हा केवळ 17 शतकं होती. मात्र 2021 हे वर्ष उजाडलं आणि रुटनं गिअर बदलला. त्यावर्षी श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच कसोटीत 228 धावा, पुढच्या कसोटीत 186 धावा मग भारताविरुद्ध आणखी एक द्विशतक अशी सलग तीन कसोटीत तीन शतकं ठोकली. ते वर्ष ज्यो रुटचंच ठरलं.

Joe Root Journey Towards Sachin Tendulkar Record: सचिनच्या विक्रमाकडे रुटचं मार्गक्रमण... 15,921 धावांचा विक्रम ज्यो रुट मोडणार?

2021 नंतर आतापर्यंत प्रत्येक कसोटीत, प्रत्येक मालिकेत ज्यो रुटची धावांची भूक वाढतानाच दिसतेय. गेल्या चार वर्षात त्यानं विराट कोहली, विल्यमसन, स्मिथ यांना कधीच मागे टाकलंय. त्यानं आपल्या कारकीर्दीतील पहिल्या आठ वर्षात 17 शतकं ठोकली होती. पण गेल्या चार वर्षात तब्बल 21 शतकं ठोकून पराक्रम गाजवलाय.

Joe Root Journey Towards Sachin Tendulkar Record: सचिनच्या विक्रमाकडे रुटचं मार्गक्रमण... 15,921 धावांचा विक्रम ज्यो रुट मोडणार?

रुटची ही आकडेवारी बरंच काही सांगून जाते. ज्यो रुट सध्या सचिनच्या विक्रमापासून जवळपास अडीच हजार धावा दूर आहे. आता तो पस्तिशीत आहे त्यामुळे या घडीला वय त्याच्या बाजूनं आहे. पुढच्या ऑगस्टपर्यंत इंग्लंडचा संघ 12 कसोटी सामने खेळणार आहे. हे सगळे सामने खेळल्यास रुट नक्कीच सचिनच्या विक्रमाच्या आणखी जवळ जाईल. त्यामुळे गेली 17 वर्ष कसोटीतील धावांचं एव्हरेस्ट म्हणून उभा असलेला सचिनचा तो विक्रम रुट खरंच मोडणार का? सचिनच्या 51 शतकांच्या विक्रमालाही रुट गवसणी घालणार का? हे आता येणारा काळच ठरवेल.

आणखी वाचा

Comments are closed.