KKR vs RR: जोफ्रा आर्चरचा ऐतिहासिक पराक्रम! KKR विरुद्धच्या सामन्यात जोरदार कामगिरी करत केली या खेळाडूची बरोबरी
राजस्थान रॉयल्सचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या (KKR) सामन्यात वादळी गोलंदाजी करत नवा इतिहास रचला आहे. त्याने या हंगामात पुन्हा एकदा डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याची किमया साधली. फलंदाजीसाठी उतरलेल्या टिम सीफर्टला त्याने पहिल्याच चेंडूवर क्लीन बोल्ड केले.
या विकेटसोबतच आर्चरने भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आयपीएलच्या एका सामन्यात दुसऱ्या डावाची सुरुवात करताना पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा आर्चर हा दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी मोहम्मद शमीने (Mohmmed Shami) राजस्थान रॉयल्सविरुद्ध असा पराक्रम केला होता. आयपीएलमध्ये डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याच्या बाबतीतही त्याने शमीची बरोबरी केली आहे. हे दोन्ही गोलंदाज आतापर्यंत 5 वेळा असा पराक्रम करून संयुक्तपणे अव्वल स्थानी आहेत.
आर्चरने या हंगामात आतापर्यंत फिल सॉल्ट आणि अभिषेक शर्मा यांनाही पहिल्याच चेंडूवर बाद केले आहे. तसेच आर्चरच्या विक्रमी गोलंदाजीनंतरही कोलकाता नाईट रायडर्सने या सामन्यात राजस्थानवर मात केली. केकेआरच्या या विजयाचे मुख्य सूत्रधार रिंकू सिंह आणि अनुकूल रॉय ठरले.
फॉर्ममध्ये परतलेल्या रिंकूने 33 चेंडूत 53 धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली आणि संघाला विजय मिळवून देऊनच तो मैदानाबाहेर परतला. अनुकूल रॉयने 16 चेंडूत 29 धावांची महत्त्वाची खेळी खेळली. या दोघांनी अवघ्या 37 चेंडूंमध्ये 76 धावांची तुफानी भागीदारी करून केकेआरला या हंगामातील पहिला विजय मिळवून दिला.
Comments are closed.