KKR vs RR: वैभव सूर्यवंशीची विकेट घेत वरुण चक्रवर्तीने रचला इतिहास; टी-20 क्रिकेटमध्ये गाजवलं वर्चस्व!
ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या IPL 2026 च्या 28 व्या सामन्यात वरुण चक्रवर्तीने (Varun Chakrawarthy) चेंडू हातात घेताच एक खास विक्रम आपल्या नावावर केला. या ‘मिस्ट्री स्पिनर’ने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये धडाका करत धोकादायक फलंदाज वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Suryavanshi) बाद केले आणि नवा इतिहास रचला.
कोलकाता विरुद्ध खेळताना राजस्थान रॉयल्सने डावाची सुरुवात अतिशय धडाक्यात केली होती. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल या जोडीने पहिल्या ओव्हरपासूनच कोलकाताच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. 8 ओव्हरमध्ये या दोघांनी धावफलकावर 79 धावा लावल्या होत्या. त्यानंतर 9 व्या ओव्हरमध्ये वरुण चक्रवर्ती गोलंदाजीला आला आणि त्याने वैभवला बाद करून कोलकाता नाईट रायडर्सला पहिले यश मिळवून दिले.
या विकेटसोबतच वरुण चक्रवर्ती टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 200 विकेट्स घेणारा भारतीय फिरकीपटू (Spin-bowler) ठरला आहे. इतकेच नाही तर, सर्व भारतीय गोलंदाजांच्या यादीत सर्वात वेगाने हा टप्पा गाठणारा तो दुसरा खेळाडू बनला आहे. भारतीय गोलंदाजांमध्ये अर्शदीप सिंगच्या नावावर सर्वात वेगाने 200 टी-20 विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. वरुण हा 200 विकेट्स घेणारा भारताचा 20 वा गोलंदाज ठरला आहे, तर फिरकीपटूंमध्ये तो 10 व्या क्रमांकावर आहे.
टी-20 मध्ये सर्वात वेगाने 200 विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज
अर्शदीप सिंग – 151 समोर
वरुण चक्रवर्ती – १५५ समोर
कुलदीप यादव – 160 समोर
जयदेव उनाडकट – १६२ समोर
मोहम्मद शमी – 165 समोर
वैभव सूर्यवंशीची विकेट एखाद्या चित्रपटातील सीनसारखी होती. वरुणने टाकलेल्या ‘फुल लेन्थ’ चेंडूवर 15 वर्षांच्या वैभवने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला. चेंडू हवेत उंच उडाला आणि रमणदीप सिंगने धावत येत एक अप्रतिम कॅच घेतला. वरुण इथेच थांबला नाही, त्याने आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये केवळ 14 धावा देऊन 3 महत्त्वाचे विकेट्स घेतले. यात त्याने रियान पराग आणि यशस्वी जयस्वाल सारख्या मोठ्या फलंदाजांनाही बाद केले.
IPL 2026 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये वरुणला फारशी लय सापडली नव्हती. पहिल्या 3 सामन्यांत त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. मात्र, चौथ्या सामन्यात गुजरातविरुद्ध 2 विकेट्स घेत त्याने फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले होते.
Comments are closed.