ह्रदयद्रावक… कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
ठाणे : जिल्ह्यातील कल्याण शहराजवळ भीषण अपघाताची (Accident) घटना घडली असून इको वाहनातील 11 जणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. येथील मुरबाड-अहिल्यानगर मार्गावर आज सकाळच्या सुमारास हृदय पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली. रायते पुलावर (Kalyan) सिमेंट मिक्सर ट्रक आणि काळी-पिवळी इको टॅक्सीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात इको टॅक्सीतील सर्व 11 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 7 जण मुरबाडचे, 1 कल्याणचा, 1 साताऱ्याचा तर दोघांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मात्र, या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, मुरबाडच्या तहसील कार्यालयातील अधिकारीही ठार झाले आहेत.
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. तर, मुरबाड तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या महसूल अधिकाऱ्याचाही या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भूषण घोरपडे (49 वर्षे) असं संबंधित महसूल अधिकाऱ्याचं नाव आहे. दीपक गवळी (26), जिजाबाई केंबारी (60), प्रशांत चेंदने (चालक 21वर्षे), अनंता पवार (60), गणपती मदे, नेहा मोपे (19), मानसी मोपे (22), प्रथमेश मोपे (15), हेमंत गुरव (45) यांचा मृत्यू झाला आहे. तर, मोपे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने कुटुबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी वाहतूक करणारी इको टॅक्सी कल्याणहून मुरबाडकडे प्रवासी घेऊन निघाली होती. रायते पुलावर एका बाजूचा रस्ता सुरू असल्याने दोन्ही दिशेची वाहतूक एकाच मार्गावरुन सुरू होती. याचदरम्यान इको टॅक्सीने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता समोरुन येणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकला ती जोरात धडकली. धडकेची तीव्रता इतकी होती की टॅक्सीचा अक्षरशः चक्काचूर झाला, त्यातच टॅक्सीतील सर्वच प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
CM देवेंद्र फडणवीसांकडून श्रद्धांजली
दरम्यान, या अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करत शोक व्यक्त केलाय. राष्ट्रीय महामार्ग 61 वर कल्याणजवळ दोन वाहनांची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. स्थानिक प्रशासनाशी आम्ही संपर्कात आहोत, असे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले.
परिवहनमंत्र्यांकडून आदरांजली
कल्याण–मुरबाड–माळशेज महामार्गावर रायते गावाच्या हद्दीत, पांजरपोळ गोशाळेजवळील उल्हास नदीवरील नव्या पुलावर आजरोजी सकाली 10.45 वाजण्याच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. कल्याणकडून प्रवासी घेऊन येणारी ओम्नी कार (क्र. MH-05 GA-0529) आणि अशोक लेलँड कंपनीचा मिक्सर (क्र. MH-12 TV-3660) यांची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातात ओम्नी कारमधील 11 निरपराध प्रवाशांचा मृत्यू झाल्याची अतिशय वेदनादायी बातमी समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले.
वाहनाची क्षमता 5+1 असताना 11 जणांचा प्रवास
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित वाहनाची अधिकृत क्षमता 5+1 असताना त्यामध्ये 11 प्रवासी प्रवास करत होते, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. राज्याचा मोटार परिवहन विभाग अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध सातत्याने कठोर कारवाई करत आहे. मात्र, अशा दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनीही जबाबदारीने वागणे अत्यावश्यक आहे. अवैध व क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणाऱ्या वाहनांमधून प्रवास करणे टाळावे, तसेच सुरक्षित आणि नियमबद्ध प्रवासाला प्राधान्य द्यावे, अशी विनंती देखील मंत्री महोदयांनी केलीय.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.