कर्जत-भीमाशंकरचे जंगल वाचवण्यासाठी कँडल मार्च
दिवाळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असतानाच पर्यावरणाच्या रक्षणासाठी कर्जतच्या पोटल गावातील तरुणाई कर्जत-भीमाशंकरचे जंगल वाचवण्यासाठी एकवटली आहे. पोटल गावातील तरुण तसेच गावकऱ्यांनी टोरंट पॉवर कंपनीसाठी करण्यात आलेल्या हजारो झाडांच्या कत्तलीचा निषेध करत कँडल मार्च काढला. यापुढे झाडे कापणाऱ्यांना जंगलात पाय ठेवू देणार नाही, असा निर्धारच त्यांनी यावेळी केला.
टोरंट प्रकल्पासाठी पोटल गावातील जंगलावर कुऱ्हाड चालवण्यात आली. त्यावेळी झालेल्या जनआंदोलनात अवघे गावकरी सहभागी झाले होते. शिवसेनेसह विविध पक्षांनी केलेल्या आंदोलनात पोटलमधील गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग होता. सर्वत्र दिवाळीचा आनंदोत्सव साजरा होत असतानाच पोटलवासीयांनी मात्र कत्तल झालेल्या झाडांसाठी कँडल मार्च काढत धारातिर्थी पडलेल्या या वृक्षांना श्रद्धांजली अर्पण केली. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा विनाश नको हा संदेश त्यांनी कँडल मार्चमधून सरकारला दिला.
Comments are closed.