कर्जत-खोपोली मार्ग चौकशीच्या फेऱ्यात; 12 वर्षे उलटली तरी शेतकऱ्यांना मोबदला नाही

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कर्जत-खोपोली महामार्ग चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने शेतकऱ्यांचा मोबदला लटकला आहे. या मार्गासाठी जमिनीचे भूसंपादन होऊन १२ वर्षे उलटली आहेत, मात्र अद्यापपर्यंत २९ शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींचा सुमारे ६० कोटी रुपयांचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे अंजरून आणि माणकिवलीतील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

कर्जत-खोपोली मार्गाचे २०१३ मध्ये दुपदरीकरण करून सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले. या मार्गासाठी अंजरून आणि माणकिवली हाळ गावातील ४१ खातेदारांच्या जागांचे भूसंपादन करण्यात आले आहे. या जागेच्या पोटी त्यांना तब्बल १६० कोटी मंजूर झाले आहेत. त्यापैकी फक्त १२ शेतकऱ्यांना १०० कोटी रुपये जमिनीचा मोबदला उपविभागीय कार्यालय कर्जत यांनी वाटप केला आहे. काही शेतकऱ्याला तब्बल ५१ कोटी तर काहींना ८ कोटी, ३.५ कोटी, १.७५ कोटी अशा भरीव रकमेचा मोबदला मिळाला आहे. मात्र उरलेल्या शेतकऱ्यांना मोबदल्यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिझवावे लागत आहेत.

मोबदल्याच्या परिगणनेत तफावत आहे. काही प्रकरणात अतिप्रदान तसेच बाधित नसलेल्या जमिनींचाही यादीत समावेश झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आहे. त्यामुळे भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांचा मोबदला पुन्हा परिक्षणासाठी पाठवण्यात आला आहे. या मोबदल्याबाबत पुन्हा सर्वेक्षण होणार आहे, असे उपविभाग अधिकारी कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबदल्याच्या १० टक्के रक्कम एजंटमार्फत मागितली जात असल्याचा आरोप होत आहे. मात्र त्यात काहीच तथ्य नाही. जर कोणी शेतकऱ्यांकडून अशी मागणी करत असेल तर संबंधित शेतकऱ्यांनी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन कर्जत उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी केले आहे.

Comments are closed.