शारजाहमध्ये कर्नाटकातील व्यक्तीची निर्घृण हत्या; शरीराचे 9 तुकडे करून कारमध्ये फेकले, पत्नी आणि मुलगा बेपत्ता

शारजाह येथे कर्नाटकातील एका व्यक्तीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्विन प्रकाश कुंदर (मूळ रा. उडुपी, कर्नाटक) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आरोपींनी अल्विनच्या मृतदेहाचे नऊ तुकडे करून दोन बॅगांमध्ये भरले आणि ओमानच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील एका पार्क केलेल्या कारमध्ये फेकून दिले. धक्कादायक बाब म्हणजे, जुलै महिन्यात घडलेल्या या थरारक गुन्ह्याचा उलगडा तब्बल दोन महिन्यांनंतर झाला असून, घटनेनंतर मृताची पत्नी आणि अल्पवयीन मुलगा बेपत्ता असल्याने गूढ अधिकच वाढले आहे.

अल्विन गेल्या १४ वर्षांपासून शारजाह विमानतळावर कार्यरत होते. ते पत्नी टीना आणि दहावीत शिकणाऱ्या मुलासह शारजाहमध्ये राहत होते. त्यांची पत्नी टीना ही देखील उडुपीचीच असून तिथे एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती.

प्रकाश यांचे भाऊ अनिल प्रशांत कुंदर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी २० जुलैच्या सुमारास प्रकाश यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रकाश यांनी कॉल उचलला नाही आणि ‘मी ठीक आहे’ असा एक टेक्स्ट मेसेज आला. प्रकाश हे नेहमी व्हॉइस मेसेजद्वारे संवाद साधत असल्याने टेक्स्ट मेसेज आल्यामुळे कुटुंबीयांना संशय आला. त्यानंतर आठवड्याभराने पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.

चिंतेत पडलेल्या अनिल यांनी शारजाहमध्ये राहणाऱ्या प्रकाश यांच्या मनोहर नावाच्या वर्गमित्राशी संपर्क साधला. मनोहर जेव्हा कंपनीने दिलेल्या फ्लॅटवर पोहोचले, तेव्हा वॉचमनने प्रकाश हिंदुस्थानात गेल्याचे सांगितले. कंपनीच्या एचआर विभागानेही सुरुवातीला ते हिंदुस्थानात गेल्याची माहिती दिली. मात्र, प्रकाश घरी पोहोचलेच नसल्याचे अनिल यांनी स्पष्ट केल्यानंतर अधिक तपास करण्यात आला. पासपोर्ट तपासात प्रकाश हे शारजाहमध्येच असल्याचे निष्पन्न झाले, ज्यानंतर ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

कारमध्ये सापडले मृतदेहाचे ९ तुकडे

तपासादरम्यान, ओमानच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर पार्क असलेल्या एका कारमध्ये प्रकाश यांचा मृतदेह आढळून आला. शरीराचे नऊ तुकडे करून ते दोन वेगवेगळ्या बॅगांमध्ये भरण्यात आले होते. शवविच्छेदनानंतर हा मृतदेह प्रकाश यांचाच असल्याचे स्पष्ट झाले.

पत्नी आणि मुलगा बेपत्ता

या घटनेनंतर प्रकाश यांची पत्नी टीना आणि त्यांचा मुलगा दोघेही बेपत्ता आहेत. ते शारजाह सोडून हिंदुस्थानात पसार झाले असावेत असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असला, तरी त्यांच्या ठावठिकाण्याबाबत आणि या हत्येशी त्यांच्या संबंधाबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

प्रकाश यांचे पार्थिव हिंदुस्थानात आणण्यासाठी कुटुंबीय स्थानिक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट पाहत आहेत. याप्रकरणी प्रकाश यांचे भाऊ अनिल यांनी उडुपीच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तपासात मदतीची मागणी केली असून, उडुपी पोलीस शारजाह प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळण्याची वाट पाहत आहेत. शारजाह पोलिसांनी अद्याप हत्येचे नेमके कारण आणि संशयितांची ओळख जाहीर केलेली नाही.

Comments are closed.