डोंबिवलीत मध्यरात्री हायव्होल्टेज राडा, शिवसेनेच्या दोन उमेदवारांना पोलिसांनी हॉस्पिटलमधून उचलल
Kalyan Dombivli Election 2026 BJP Vs Shivsena: कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता संपल्यानंतर डोंबिवलीत (Dombivli News) काल रात्री हायव्होल्टेज ड्रामा झाल्याचे पाहायला मिळाले. दोन दिवसांपूर्वी डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजप उमेदवार आर्या नाटेकर यांच्या पतीला मारहाण झाली होती. याप्रकरणी मंगळवारी रात्री पोलिसांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील (Nitin Patil) आणि रवी पाटील (Ravi Patil) यांना ताब्यात घेतले. मात्र, या दोघांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रात्रीच डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोघांना पोलिसांनी अटक केल्यामुळे रवी पाटील आणि नितीन पाटील यांना मतदान करता येणार की नाही, याबाबत प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील तुकाराम नगर परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जवळपास 200 पोलीसांचा फौजफाटा या परिसरात तैनात करण्यात आला आहे. (KDMC Election 2026)
डोंबिवलीच्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये रविवारी भाजप उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर हे पैसे वाटत असल्याची माहिती रवी पाटील आणि नितीन पाटील यांना मिळाली होती. या दोघांनी आपल्या कार्यकर्त्यांसह त्याठिकाणी जाऊन ओमनाथ नाटेकर यांना मारहाण केली होती. यामध्ये ओमनाथ नाटेकर गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेला दोन दिवस उलटल्यानंतर काल रात्री पोलिसांनी मतदानाच्या तोंडावर रवी पाटील आणि नितीन पाटील यांना अटक केल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. रवी पाटील आणि नितीन पाटील हे दोघेही नाटेकर यांना मारहाण करताना जखमी झाल्यामुळे हे दोघेही खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र, पोलिसांनी रुग्णालयात जाऊन या दोघांना ताब्यात घेतले आणि चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले आणि अटक केली. यानंतर पोलिसांनी या दोघांना वैद्यकीय तपासणीसाठी डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेले. या सगळ्यामुळे शिवसैनिक प्रचंड संतप्त झाले. त्यांनी शास्त्रीनगर रुग्णालयाबाहेर प्रचंड गोंधळ घातला.
ओमनाथ नाटेकर यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये रवी पाटील आणि नितीन पाटील यांच्या मुलांचाही समावेश आहे. यापैकी सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. रवी पाटील आणि नितीन पाटील यांच्या अटकेनंतर शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी पोलिसांकडून दडपशाही सुरु असल्याचा आरोप केला. आमच्या दोन्ही उमेदवारांची प्रकृती ठीक नसतानाही पोलिसांनी त्यांना अटक केली. आता त्यांना काही झाले तर पोलिसांची जबाबदारी आहे, असा इशारा आमदार राजेश मोरे यांनी दिला.
आणखी वाचा
मुंबईच्या वॉर्ड नंबर 124 मध्ये राडा, दोन्ही शिवसेना भिडल्या, ठाकरे गटाचे कार्यकर्ते मारहाणीत जखमी
आणखी वाचा
Comments are closed.