बेकायदा शॉपिंग सेंटरला केडीएमसीचे अभय, कल्याणमध्ये शिवसैनिकांचे उपोषण
काटेमानिवली नाका येथील ‘ललित फॅमिली शॉप-ललित कलेक्शन’ या नावाने अनधिकृत शॉपिंग सेंटर उभारले असून पालिकेने बेकायदा बांधकामधारकांना अभय दिल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षाचे शहर संघटक ऋतुकांचन रसाळ यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
कर्पेवाडी परिसरात राज बिल्डर नावाच्या बांधकाम व्यावसायिकाने बेकायदा बांधकाम केले आहे. ऋतुकांचन रसाळ यांच्या तक्रारीनंतर पालिकेने ललित फॅमिली शॉपचे बांधकाम अनधिकृत घोषित केले. मात्र बांधकाम पाडण्याऐवजी प्रशासन केवळ वेळकाढूपणा करत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी ऋतुकांचन रसाळ यांनी 11 मेपासून पालिका मुख्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यानंतर पालिकेतील शिवसेना गटनेते उमेश बोरगावकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आयुक्त अभिनव गोयल यांना फोन करून बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याची विनंती केली. यावेळी जिल्हाप्रमुख शरद पाटील, शहरप्रमुख हेमंत चौधरी, विभागप्रमुख अरुण निंबाळकर, उपशहरप्रमुख प्रमोद कांबळे, नीलेश देसले, प्रसाद देवरे, कक्ष विभाग संघटक गणेश साळवी, अनिल साटम, उदय चौधरी आदी उपस्थित होते.
■ पालिकेच्या ‘जे’ प्रभाग कार्यालयाच्या साहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण देत तोडक कारवाईबाबत चालढकल सुरू केल्याचा आरोप ऋतुकांचन रसाळ यांनी केला आहे.
Comments are closed.