‘मी घरासाठी सून आणायला गेलो होतो, पण मुलगाच गमावला’; केतन अग्रवालच्या वडिलांचा अश्रूंचा बांध फु
केतन अग्रवाल प्रकरण: पुणे जिल्ह्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील (Ketan Agrawal Murder Case) मुख्य संशयित आरोपी सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरी (Chetan Choudhari) यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी काल (16 जुलै) वडगाव मावळ न्यायालयात (Vadgaon Maval Court) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने दोन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर आज केतनच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आपल्या एकुलत्या एक मुलाच्या आठवणीने आणि त्याच्यावर झालेल्या अन्यायावर बोलताना केतनच्या वडिलांचे अश्रू अनावर झाले.
केतनचे वडील म्हणाले की, “हे दुःख आमच्यासाठी समुद्रापेक्षा मोठे आहे. मी तर आपल्या मुलाचे लग्न करायला निघालो होतो, ते तर झाले नाही. परंतु माझ्या घरी इतके मोठे दुःख आले आहे की, आज माझा मुलगा देखील राहिला नाही आणि माझे वडील देखील राहिले नाहीत. प्रत्येक मनुष्य हे स्वप्न बघतो की आपला मुलगा आपल्याला म्हातारपणी सांभाळेल, ते आज काहीच राहिलेले नाही. मला एकच मुलगा होता, तो देखील गेला. हे दुःख मी जिवंत आहे तोपर्यंत तरी कमी होऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले.
Ketan Agrawal Case: लग्न जुळवून देणारे मित्तल कुटुंबही जबाबदार
लग्न ठरवताना मध्यस्थ कोण होते? याबाबत विचारले असता केतनचे वडील म्हणाले की, “हे लग्न माझे सख्खे चुलत मामा आणि मामी नरेंद्र जगन्नाथ मित्तल आणि रेणू नरेंद्र मित्तल यांनी जुळवून दिले होते. त्यांनी मला पूर्ण विश्वास दिला होता की, ‘ही मुलगी आमचीच मुलगी समजा. आम्ही तिला लहानपणापासून मोठं केलं आहे. ती खूप संस्कारी आणि चांगली मुलगी आहे.’ इतकी खात्री दिल्यानंतर आम्ही हे लग्न ठरवलं. आता परिस्थिती पाहता, त्यांनाही याबाबत माहिती होती का, असा प्रश्न मला पडतो. न्यायव्यवस्थेवर मला भरोसा आहे. याबाबत तपास होईल. लग्न जुळवून देणारे मित्तल कुटुंबही जबाबदार आहे,” असा आरोप त्यांनी यावेळी केला.
केतन सियासोबत भांडण होत आहेत, याबाबत तुम्हाला काही सांगितले होते का? असे विचारले असता ते म्हणाले की, “केतन सांगायचा की, कधी-कधी ती नाराज होते, चिडचिड करते. तिचा फोन कायम एंगेज असायचा. आम्हाला वाटायचं की, नवीन नातं आहे, त्यामुळे काही अपेक्षा असतील. आम्ही त्याला समजवायचो की, अजून नवीन आहे, हळूहळू सगळं व्यवस्थित होईल,” असे केतनचे वडील म्हणाले.
Ketan Agrawal Case: पंतप्रधानांना पत्र का लिहिले? केतनचे वडील म्हणाले…
केतन अग्रवालच्या वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित न्यायाची मागणी केली आहे. याबाबत विचारले असता “मी माझी व्यथा पंतप्रधानांकडे व्यक्त केली आहे. माझ्या मुलाची काहीही चूक नसताना त्याच्यासोबत असे घडले. तो चांगला, सुशिक्षित मुलगा होता. त्याच्यावर अन्याय झाला आहे. माझ्या मुलाला लवकरात लवकर न्याय मिळावा, एवढीच माझी प्रार्थना आहे,” असे त्यांनी सांगितले.
Ketan Agrawal Case: केतनचे वडील झाले भावूक
“प्रत्येक बाप एक स्वप्न पाहतो की, आपल्या मुलाचं लग्न व्हावं, त्याचा सुखी संसार व्हावा. त्यामुळे मी आमच्या घरासाठी एक सून आणायला गेलो होतो. पण माझा 26 वर्षांचा मुलगा गेला, माझं दुःख खूप मोठं आहे. जे माझ्या मुलासोबत घडलं, ते कोणासोबतही होऊ नये. सियाने जर एकदा स्पष्टपणे ‘नाही’ म्हटलं असतं, तर ही घटना घडलीच नसती,” हे सांगताना केतनच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. सिया आणि चेतनच्या लग्नाबाबत माहिती होती का? या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, “मला याबाबत काहीही माहिती नव्हती. मला जी काही माहिती समजली ती मीडियाच्या माध्यमातूनच समजली आहे, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Comments are closed.