विराट कोहलीने साथ सोडताच ‘वन-8 कम्यून’ कोट्यवधींच्या कर्जात; बंगळुरूमधील रेस्टॉरंटला लागलं टाळं!

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याच्या नावाशी जोडले गेलेले बंगळुरूमधील प्रसिद्ध रेस्टॉरंट ‘वन-8 कम्यून’ (One8 Commune) अखेर बंद झाले आहे. बंगळुरू सिव्हिल कोर्टाच्या आदेशानंतर या आउटलेटला टाळे ठोकण्यात आले.

या रेस्टॉरंटच्या मालकांनी 2 कोटी रुपयांहून अधिक भाडे आणि इतर देयके थकवली होती. ‘ट्रायो हिल्स हॉस्पिटॅलिटी’ या कंपनीद्वारे हे रेस्टॉरंट चालवले जात होते, ज्यांनी गेल्या 6 महिन्यांपासून भाडे आणि देखभालीचा (Maintenance) खर्च दिला नव्हता. त्यामुळे कोर्टाने हे थकीत भाडे भरेपर्यंत आउटलेट बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

विराट कोहली या रेस्टॉरंटचा सह-मालक (Co-owner) होता, परंतु त्याने आधीच या प्रोजेक्टपासून स्वतःला पूर्णपणे वेगळे केले होते. नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे पाहून कोहलीने आपली भागीदारी संपवली आणि आपल्या ‘One8’ या ब्रँडचे नावही तिथून हटवले होते. हे रेस्टॉरंट सुरू झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात होते. अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) न घेणे आणि इतर सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल बंगळुरू महानगरपालिकेने याला अनेकदा नोटीस बजावली होती. तसेच, ठराविक वेळेपेक्षा जास्त काळ रेस्टॉरंट सुरू ठेवल्याबद्दलही गुन्हे दाखल झाले होते. या सततच्या तक्रारींमुळेच कोहलीने वेळीच यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

बंगळुरूमधील हे आउटलेट डिसेंबर 2023 मध्ये सुरू झाले होते. ही एक प्रीमियम रेस्टॉरंट चेन असून दिल्ली, गुरुग्राम, पुणे, कोलकाता, नोएडा आणि हैदराबाद सारख्या मोठ्या शहरांत ती कार्यरत आहे. हे ब्रँड ‘ट्रू पॅलेट हॉस्पिटॅलिटी’च्या भागीदारीत चालवले जाते. भाडे थकवल्यामुळे आणि नियमांचे पालन न केल्यामुळे कोर्टाने हे पाऊल उचलले आहे, मात्र विराट कोहलीने या वादापूर्वीच रेस्टॉरंटशी असलेले सर्व संबंध तोडले होते.

Comments are closed.