तीन संचालकांना अपात्र का करू नये? म्हणणे सादर करण्याची नोटीस, कोल्हापूर बाजार समिती भूखंड प्रकरण
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीवरील तब्बल तीन हजार सहाशे चौरस फुटांचा भूखंड नातेवाईकांच्या नावावर घेणाऱ्या शेखर देसाई, सुयोग वाडकर आणि भारत पाटील या तीन संचालकांना सहकार कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी संचालक पदावरून अपात्र का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करत, याबाबत 19 मेपर्यंत म्हणणे सादर करण्याची नोटीस जिल्हा सहकारी उपनिबंधक निळकंठ करे यांच्याकडून देण्यात आली आहे.
याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते संजय पवार आणि सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी लक्ष वेधले होते.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक शेखर देसाई व सुयोग वाडकर यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे, तर भारत पाटील यांनी मुलाच्या नावे समितीच्या मालकीची मालमत्ता भाडेतत्त्वावर घेतली आहे.
या संचालकांकडून महाराष्ट्र शेती उत्पन्न बाजार समिती निवडणूक नियम 2017 चे नियम क्रमांक 10(1) याचा भंग झाल्याने हे तिघेही कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून राहण्यास अपात्र असल्याचे निवेदन उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांना दिले होते. तसेच याचा पाठपुरावाही सादर केला होता.
शेती उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱयांच्या हितासाठी आहे की, संचालकांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या हितासाठी आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच याची गांभीर्याने दखल घेऊन या संचालकांना अपात्र करावे तसेच या कामात सहभागी असलेल्या सचिव तानाजी दळवी यांच्यावर बडतर्फीचे आदेश द्यावेत, अशी मागणीही संजय पवार आणि विजय देवणे यांनी केली होती.
Comments are closed.