आजीच्या सोन्यावर नातवाचा डोळा; चहात विषारी रसायन घालून दिलं अन्…; आधी मृत्यूची खात्री केली, म
कोल्हापूर : कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चैनीसाठी दागिने लुटण्यासाठी चहातून विषारी औषध पाजून (Kolhapur Crime News) चुलत नातवाने कोल्हापुरातील गंगावेश येथील ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळील शुक्रतारा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या उषा मारुती भिऊंगडे (वय ७२) यांचा खून (Kolhapur Crime News) केल्याचे काल (शुक्रवारी, ता २०) उघड झाले आहे. या घटनेनंतर नागिरकांमधून संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तातडीने तपास करून मृत महिलेचा नातू प्रेम परशराम भिऊंगडे (वय २०, रा. चिंतामणी पार्क, फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) याला अटक केली.(Kolhapur Crime News)
आजीचे सोन्याचे दागिने लुटण्यासाठी तिचा खून केल्याची कबुली
नातवानेच आपल्या चैनीसाठी पैशांची गरज असल्याने आजीचे सोन्याचे दागिने लुटण्यासाठी तिचा खून केल्याची कबुली पोलिस तपासात दिली. पोलिसांनी या घटनेप्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, उषा भिऊंगडे या पतीसह राहात होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाल्याने त्या घरामध्ये एकट्याच राहात होत्या. त्यानंतर पुतण्या परशराम त्यांना औषधे व इतर मदत करत होते. सोमवारी उषा या घरी बेशुद्ध पडल्या होत्या. त्यावेळी परशराम याने त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र त्या उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याचवेळी उषा यांचा मृत्यू संशयास्पद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.(Kolhapur Crime News)
पोलिसांनी मृत महिलेचा दैनंदिन सवयी, त्यांच्यावर सुरु असलेले औषधोपचार, त्यांचे शेजारी व नातेवाईक अशा वेगवेगळ्या लोकांकडून माहिती घेऊन तपास केला. त्यावेळी मृत उषा यांचा चुलत नातू प्रेम मृत्यूच्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी घरी येऊन गेल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे प्रेम भिऊंगडे याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने आपल्या चैनीसाठी पैशांची गरज होती. त्याला उषा यांचे दागिने लुटायचे होते. म्हणून सोन्यात वापरण्यात येणारे विषारी रसायन मानवी जीवितास अपायकारक आहे, याची माहिती असताना ते चहामध्ये टाकले. तो चहा उषा यांना दिला. त्या चहा प्यायल्यानंतर बेशुद्ध पडल्या व त्यातच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती चौकशीवेळी दिली.(Kolhapur Crime News)
आधी मृत्यूची खात्री केली अन् मग दागिने लुटले…
आपली आजी मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर प्रेमने उषा यांच्या दोन्ही हातातील सोन्याच्या सहा पाटल्या, गळ्यातील दोन सोन्याच्या चेन, उजव्या कानातील फुल अशा सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. उषा या वयोवृद्ध असल्याने त्यांचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्याचा बनाव केला असल्याचे सांगितले त्याचबरोबर त्याने खुनाची कबुली दिल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आणखी वाचा
Comments are closed.