कोल्हापुरात राज्य उत्पादन शुक्लची मोठी कारवाई, 1.30 कोटींची गोवा बनावटी विदेशी दारू जप्त

कोल्हापूर : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली. गोवा बनावटी विदेशी दारूचा तब्बल 1 कोटी 30 लाख 50 हजार रुपयांचा साठा वाहनासह जप्त केला आहे. या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई शाहुवाडी तालुक्यातील अणुस्कुरा गावच्या हद्दीत करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त (दक्षता व अंमलबजावणी) प्रसाद सुळे आणि विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशानुसार तसेच कोल्हापूर जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे आणि उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सदर गुन्ह्यात निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक अभयकुमार सावळे, अजय वाघमारे, स. दु.नि. कांचन सरगर आणि जवान सचिन लोंढे, विलास पवार, विशाल भोई, धीरज पांढरे व वाहन चालक साजिद मुल्ला यांनी सहभाग घेतला.

पहाटे 5.30 वाजता अणकुडा फाट्यावर छापा

दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, शाहूवाडी तालुक्यातील अणुस्कुरा फाटा (Rajapur–Malkapur Road) येथे पहाटे 5.30 वाजता  अशोक लेलँड कंपनीचा MH-20-EG-1310 क्रमांकाचा 6 चाकी ट्रक थांबवण्यात आला. वाहनाची झडती घेतली असता कंटेनरमध्ये रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की (Royal Blue Malt Whisky) या ब्रँडची गोवा राज्यात तयार होणारी आणि महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेली विदेशी दारू आढळून आली.

76,800 बाटल्या, 1,600 बॉक्स जप्त

या कारवाईत 180 मिली क्षमतेच्या 1,600 बॉक्समधील एकूण 76,800 सिलबंद बाटल्या (13,824 बल्क लिटर) जप्त करण्यात आल्या. या दारूची किंमत 1 कोटी 15 लाख 20 हजार रुपये असून, ट्रक व मोबाईलसह एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 1 कोटी 30 लाख 50 हजार रुपये आहे.

राजस्थानमधील आरोपी अटकेत

या प्रकरणी रामजीवन विरधाराम बिश्नोई (वय 26, रा. बाडमेर, राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत कलम 65(a), 65(e), 83, 90, 108 नुसार गुन्हा क्रमांक 19/2026 दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक अजय वाघमारे हे करीत आहेत.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.